

वृत्तसेवा: पुढारी वृत्तसेवा
आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांत दबावतंत्राची खेळी सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना जागावाटपाच्या निमित्ताने बरीच कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या शंभरहून अधिक मतदारसंघांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने निरीक्षक आणि प्रभारींच्या नियुक्त्या केल्या; तर अजित पवारांच्या पक्षानेही सन्मानजनक जागा लढविणार असल्याचे सांगत दबाव वाढविला.
मित्रपक्षांच्या या वाढत्या दबावाला कमी करण्यासाठी राज्यातील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, अशी भूमिका भाजप नेते मांडत आहेत. जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच दबावाचे राजकारण महायुतीत सुरू झाले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून सुमारे ११३ जागांवर निरीक्षक आणि प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांच्या निमित्ताने शिंदे गटाने शंभरहून अधिक जागांवर दावेदारीला सुरुवात केली आहे. बहुतांश मतदारसंघातील निरीक्षक किंवा प्रभारीच उमेदवार असण्याची शक्यता शिदे गटाकडून वर्तविली जात आहे.
शिंदे गटाच्या शंभरीच्या चर्चा एकीकडे रंगल्या असतानाच अजित पवार गटानेही, 'महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. आम्ही सन्मानजनक जागा लढणार,' अशी भूमिका मांडली जात आहे.
किमान ८० ते ९० जागांवर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे; तर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्व २८८ जागा भाजपने लढवाव्यात, असे व्यक्तिगत मत मांडले.
जागावाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या हवाल्याने चर्चा सुरू झाल्या. त्यावर, अजून जागावाटपाबाबत कुठेही काही ठरलेले नाही. आम्ही सध्या चाचपणी करतो आहोत. तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार, हे निश्चित आहे.
जागावाटपाचा विषय हा दिल्लीत अंतिम होईल. आमचे पक्षश्रेष्ठी याबाबत शेवटचा निर्णय घेतील, असे सांगत मंत्री गिरीश महाजनांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली.
आम्ही एक समन्वय समिती नेमणार आहोत. माझ्या माहितीनुसार, जागावाटपाच्या संदर्भात कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही निवडून येण्याची क्षमता बघून या सर्व गोष्टींचा निर्णय घेणार, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. तसेच, स्वबळावर निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. महायुतीत अधिक जास्त प्रमाणात आहे. क्रांतिकारी योजनांमुळे आपल्याला विधानसभेत जाण्याची संधी मिळण्याची कार्यकर्त्यांनी भावना धरली तर त्यात वावगे नाही, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी, युतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत ठरेल.
तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र याबाबतचा निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो अंतिमतः सर्वांना मान्य राहील. आमच्यात कुठेही कुरबुर होणार नाही याची काळजी आम्ही सर्वांनी घेतल्याचे सांगितले.
आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत त्यात दुमत असायचे कारण नाही. महाराष्ट्रात २८८ जागा लढण्याची क्षमता आणि त्या ताकदीचे उमेदवार भाजपकडे आहेत. परंतु, याचा अर्थ २८८ ठिकाणी भाजप उमेदवार उभे करणार, महायुतीचे काय होणार, असा तर्क काढण्याची गरज नाही. आम्ही समन्वयाने, सुसंवादातून- एकोप्याने महायुती म्हणून सामोरे जाऊ आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावू, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
आमची विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढण्याची तयारी आहे; पण महायुतीत लढायचे आहे. आमच्या सहयोगी पक्षांना जागा दिल्यानंतर आम्ही उरलेल्या जागा लढणार.
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील