

वाडा : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे राजकारण ढवळून टाकणारी घटना शिवसेनेच्या गोटात घडली असून सेनेचे महत्त्वाचे नेते व
राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी अने आमदारांसह सेनेत बंडाचे निशाण फडकावले आहे. शिंदे यांच्या टीममध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे सहभागी झाले असून यामुळे वाडा तालुक्यात खळबळ माजली आहे. वाडा तालुक्यात मात्र शिंदे गटाला न जुमानता उद्धव ठाकरे हेच आमचे सर्वेसर्वा असल्याचे फलक शहरात पाहायला मिळत असून बैठकीत याबाबत एकमत झाल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
भिवंडी ग्रामीण मतदार संघातील वाडा हा परिसर महत्त्वाचा असून सेनेचा हा बालेकिल्ला आहे असे म्हटले तर वावग ठरणार नाही. यासोबत वाडा नगरपंचायत सेनेच्या हाती असून वाडा पंचायत समिती व पालघर जिल्हा परिषदेत सेनेचा वरचष्मा आहे. बाळासाहेब व आनंद दिघे यांसह सेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांची वाडा तालुक्यावर खास दृष्टी असते. एकनाथ शिंदे हेच वाडा तालुक्यातील सेनेचा प्रमुख दुवा असल्याने शिंदे यांसोबत स्थानिक आमदारांच्या बंडामुळे काहिशी संभ्रम अवस्था शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झालेली आहे. मागील सहा महिने राज्यात ज्या नाट्यमय घडामोडी सुरू आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांच्या प्रतिमा आधीच मलिन झालेल्या असताना शिंदे गटाने हाती घेतलेले बंडाचे निशाण यावर कळस चढविणारे आहे. सामान्य लोकांना व कार्यकर्त्यांना नेमकी काय प्रतिक्रीया द्यावी, असा प्रश्न पडलेला असून उद्धव ठाकरेंनी आदेश द्यावा मग शिवसैनिक काय भूमिका घेतात हे बघावे, असे मत शिवसैनिक खासगीत व्यक्त करीत आहेत.
विक्रमगड शहरात एका कार्यकर्त्याने शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली असली तरी सेनेच्या जवळपास 90 टक्के कार्यकर्त्यांची भूमिका उद्धव ठाकरे यांना सहकार्य करण्याची व काहीही झाले तरी त्यासोबत राहण्याची जाहीर केली आहे. वाडा शहरात देखील बॅनर लावून ठाकरे यांनाच जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान निवडणुका घ्या मग बंडखोर आमदारांना त्यांची जागा जनता दाखवेल असाही सुर वाडा तालुक्यातून उमटत आहे.