पालघरात बहरतेय उन्हाळी भातशेती

पालघरात बहरतेय उन्हाळी भातशेती

विक्रमगड;  पुढारी वृत्तसेवा :  कष्टप्रद आणि त्रासाची ठरत असल्याच्या सबबीखाली सध्या शेती करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे गावातील शेतीच्या पडीक क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र काही गावांतील शेतकऱ्यांचे शेती हाच श्वास असल्याने शेतीसाठी ते काही ही करायला सदैव तत्पर असतात.

विक्रमगड तालुक्यातील भातशेती हे प्रमुख पीक आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरिपात तर भात लागवड होतेच परंतु उन्हाळी हंगामातसुद्धा लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झड़पोली आणि अजुबाजूच्या गावात भात पिकाची लागवड करुन येथील प्रयोगशिल शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहे. यावर्षी परतीच्या पावसाने भात पिक तयार होण्याच्या हंगामात दगा दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्याचे भात पिकाचे ५० ते ६०% उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पिक कर्ज कसे फेडायचे? या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झड़पोली, सजन आणि परिसराच्या गावातील शेतकऱ्यानी उन्हाळी भात शेतीची लागवड केली आहे.

पीक अधिक मिळण्याची आशा…

पावसाळी हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यात सूर्यप्रकाश कमी असतो. याउलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच मार्च – एप्रिल महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे खतास प्रतिसाद जास्त मिळतो. तसेच उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आद्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही रोगाचे प्रमाण पावसाळी भात पिकापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते. पावसाळी पेक्षा उन्हाळी हंगामात भात पिक चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

उन्हाळी शेतीत स्थानिक जातीची लागवड…

उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत १८४, कर्जत ३, कर्जत ४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर- १ आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणाऱ्या जाती वापर केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news