

मिरारोड; पुढारी वृत्तसेवा : मिरा रोड पोलीस ठाणे हद्दीत राहणार्या अभिनेत्री व तिच्या मित्रांना ऑनलाईन गुंतवणूक करून चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून 37 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरारोड येथे राहणारी प्रतिमा निकोसे ही अभिनेत्री मराठी मालिकेमध्ये काम करते. या अभिनेत्रीला तिच्या ओळखीच्या संजय मांजरेकर या इसमाने एएफसी या कंपनीत ऑनलाईन गुंतवणूक केल्यानंतर चांगला नफा मिळतो, तेव्हा तुम्ही थोडी गुंतवणूक करून पहा असे सांगितले. तेव्हा या अभिनेत्रीने 1 हजार रुपये गुंतवणूक केली.त्यावेळी मांजरेकर याने तुम्ही तुमच्या मित्रांना सांगितले तर तुम्हाला आणखी नफा मिळेल असे सांगितले. या एएफसी कंपनीचे मुख्य संचालक या अंशू मेहरा या महिला असून दुसरे जय मल्होत्रा हे आहेत, असे सांगून फोनवर बोलणे करून दिले. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई व एक कार्यालय दुबई येथे आहे. त्यामुळे अभिनेत्रीने विश्वास ठेवून तिच्या मित्रांना गुंतवणूक करण्याबाबत सांगितले. या अभिनेत्रीला काही दिवसांनी चांगला नफा मिळाला. प्रतिमाला विश्वास पटताच तिने आणखी काही मित्रांना गुंतवणूक करण्यास सांगितली. हा आकडा 37 लाखांच्या घरात होता. मात्र त्यानंतर कंपनीचे मुख्य संचालक असलेले अंशू मेहरा व जय मल्होत्रा हे कंपनी बंद करून सगळी रक्कम घेवून फरार झाले आहेत. या प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्रीने याबाबत संजय मांजरेकर याला विचारणा केली असता त्याने सांगितले की, त्याचा भाऊ सचिन मांजरेकर हा ऑनलाईन सर्च करीत असतांना त्याला एएफसी कंपनीची माहिती इंटरनेटद्वारे मिळाली होती. अंशू मेहरा आणि जय मल्होत्रा हे कोठे राहतात किंवा ते खरोखर आहेत किंवा नाही, तसेच कंपनीचे कार्यालय, अंधेरी किवा दुबई येथे आहे किंवा नाही हे सुध्दा त्याला माहीत नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागलेय.