World Tribal Day | जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला बाळ गोपाळांनी दुमदुमवली खोडाळा नगरी

इंटरनॅशनल स्कूलच्या तारपा नृत्याने आणली बहार; घोषणाबाजीने परिसरात नवचैतन्य
Khodala World Tribal Day
Khodala World Tribal DayPudhari
Published on
Updated on

Khodala World Tribal Day

दीपक गायकवाड

खोडाळा : पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत, आदिवासी संस्कृतीचा अभिमान उराशी बाळगत चिमुकल्यांनी आज खोडाळा बाजारपेठ अक्षरशः दणाणून सोडली. उद्या ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली भव्य प्रभातफेरी आणि लयबद्ध तारपा नृत्य हे खोडाळा ग्रामस्थांच्या दृष्टीचे पारणे फेडणारे ठरले.

सकाळच्या प्रहरी शाळेच्या प्रांगणातून या रंगतदार रॅलीला सुरुवात झाली. पारंपरिक आदिवासी वेशभूषा, डोक्यावर हिरव्या पानांचे मुकुट, कमरेला पर्णपाती वस्त्रे, हातात तिर-कामठी घेऊन सजलेली ही बाळ गोपाळांची सेना पाहताच बाजारपेठेत उत्साहाचे वारे वाहू लागले.

Khodala World Tribal Day
Palghar Crime News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

"आम्ही आदिवासी, निसर्गाचे वारसदार" च्या बुलंद घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. हातात 'World Indigenous Day' चे फलक घेऊन शिस्तबद्ध रांगेत चालणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुसूत्र नियोजन आणि त्यांच्यातील शिस्त ही विशेष लक्षणीय ठरली. पावसाची पर्वा न करता शिक्षकवृंद छत्री घेऊन विद्यार्थ्यांच्या सोबतीने मार्गक्रमण करत होते, हे चित्र आदिवासी संस्कृती जपण्याच्या धडपडीचे मूर्तिमंत प्रतीक होते.

रॅलीचा कळसाध्याय ठरला तो छत्रपती शिवाजी महाराज चौकात. येथे विद्यार्थ्यांनी तारपा वाद्याच्या तालावर ठेका धरत सादर केलेल्या लयबद्ध तारपा नृत्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली. चिखलाने भरलेल्या रस्त्यावरही त्या चिमुकल्यांच्या पायातील ठुमक्यात जराही खंड पडला नाही. त्यांच्या नृत्यातून आदिवासी परंपरेचा सळसळता उत्साह, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि एकतेचा संदेशच जणू ओसंडून वाहत होता. बाजारात जमलेल्या ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि मोबाईलमध्ये हे क्षण कैद करत भरभरून दाद दिली.

Khodala World Tribal Day
Palghar News: पालघरच्या विक्रमी पावसाने जनजीवन विस्कळीत; पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात पाहणी दौरा

एकंदरीत, केवळ एक रॅली न राहता, ही प्रभातफेरी आदिवासी संस्कृतीच्या जागराची आणि अस्मिता जपण्याची प्रेरणादायी गाथाच ठरली. या उपक्रमामुळे जागतिक आदिवासी दिनाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांच्या मनावर तर बिंबवलाच, पण संपूर्ण खोडाळा बाजारपेठेतही नवचैतन्याची लहर पसरवून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news