

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आहे. येथील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट व बी. भरुचा मार्ग हे पाच रस्ते चकचकीत होत असून हेरिटेज वॉकसाठी ते सज्ज होत आहेत.
पालिका आयुक्त भूषण गगराणी, महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी या परिसराची पाहणी करीत कामांचा आढावा घेतला. यावेळी सहायक आयुक्त जयदीप मोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
काळा घोडा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि कलात्मकदृष्ट्याही देखणा परिसर आहे. येथे संग्रहालये, कला दालने व ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती आहेत. दरवर्षी भरविला जाणारा काळा घोडा कला महोत्सव या परिसराची सांस्कृतिक ओळख आहे.
हा परिसर युनेस्कोच्या ‘व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको आसम्बल ऑफ मुंबई’ या जागतिक वारसा स्थळाला लागूनच असल्यामुळे मुंबईकरांना हेरिटेज वॉकचा आनंद घेता यावा, यासाठी पाच रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण 3 हजार 443 चौरस मीटर क्षेत्रफळावर सुशोभीकरण करण्यात येत आहे. या परिसरात खमंग पदार्थांचे विविध उपाहारगृहे, आभुषणांची दालने, वस्रांची दालने आहेत. या परिसरात फेरफटका मारताना, खरेदी करताना, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतांना पर्यटकांना अन्य सुविधाही पुरविण्यासाठी महानगरपालिकेने सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत.
सुशोभीकरणात काय
अगामी काळात या परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. चारही बाजूंना अद्ययावत बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत.
बी. भरूचा मार्गावरील चौकात ‘प्लाझा’ साकारण्यात येणार असून करडा आणि काळा ग्रॅनाईट तसेच बेसॉल्ट फरशीचा यासाठी वापर करण्यात येत आहे.
या प्लाझाजवळ टेबल-खुर्चीवर बसून मुंबईकर, पर्यटक या परिसराचा, येथील स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेवू शकणार आहेत.
संपूर्ण परिसरात पर्यटकांना सुखावणाऱ्या वळणदार पायवाटाही साकारण्यात आल्या असल्याचे पालिका आयुक्तांकडून सांगण्यात आले.