

वाडा : वाडा शहरातील हनुमान मंदिराच्या समोर सकाळच्या सुमारास एका भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना अक्षरशः चिरडले. डाहे गावातील दोघे तरुण शहराच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओ बघून सांगितले जात आहे. वाडा शहरातील सर्वात अरुंद रस्ता याच भागात असून रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
डाहे गावातील साईनाथ सालकर (21) व जितेंद्र लाखात (20) हे दोघे तरुण वाडा शहरात कामानिमित्त आले होते. हनुमान मंदिराच्या समोर सकाळी 9 च्या सुमारास त्यांची दुचाकी रस्त्यावरील पाण्यावर घसरली व समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला धडकली. ट्रकच्या मागील चाकाखाली यातील चालक असणारा साईनाथ अक्षरशः चिरडला गेला तर मागे बसलेला जितेंद्र किरकोळ जखमी झाला.
साईनाथवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वाडा शहरातील रस्त्याचे नुकताच रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात आले मात्र याच भागात स्थानिकांच्या विरोधामुळे रुंदीकरण रखडले आहे. तीव्र वळण व रस्त्यावर सतत येणारे सांडपाणी यामुळे शहरातील या भागात मार्ग धोकादायक बनला आहे. घडलेल्या या गंभीर अपघाताने शहरातील रस्त्यावरील धोका उजेडात आला असून याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.