

वाडा : वाडा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी 17 मतदानकेंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. नगरपंचायत क्षेत्रात 12 हजार 893 मतदार असून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 52.11 टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या अखेरीस जवळपास 62 टक्के मतदान झाले. नगरपंचायत हा थेट नागरिकांशी जोडलेला विषय असल्याने वाडा शहरातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. सकाळच्या सत्रात मंदावलेले मतदान दुपार नंतर मात्र झपाट्याने वाढले असून मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त असल्याने छावणीचे रूप आल्याचे बघायला मिळाले.
वाडा नगरपंचायतीच्या 17 प्रभाग सदस्यांसह 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक मंगळवारी पार पडली. वाडा शहरातील जिल्हा परिषद शाळा, दगडीशाळा, काथोडपाडा, उर्दू शाळा, तळ्याचा पाडा, गणेश मैदान अशा जवळपास 17 केंद्रांवर मतदान घेण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात असून भाजपा व सेनेच्या उमेदवारांमध्ये चुरस बघायला मिळेल असा अंदाज आहे. 17 प्रभागात नगरसेवक पदांसाठी 67 उमेदवार उभे असून यातही सेना व भाजपच्या उमेदवारांमध्येच काटे की टक्कर होणार असेच बोलले जात आहे.
वृद्ध, अपंग व तरुणांनी या निवडणुकीत विशेष उत्साह दाखविला असून मतमोजणीच्या तारखेबाबत अनिश्चितता असल्याने उमेदवारांची धडधड कायम राहणार आहे. अन्य निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून मोबाईल वापरावर कडक निर्बंध लादण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी काटोकोर नियोजन ठेवल्याने मतदार निर्विघ्न पार पडले मात्र मतदार याद्यांमध्ये घोळ कायम असल्याने अनेक मतदारांना निराश व्हावे लागल्याचे सांगण्यात आले.