

डहाणू :डहाणू नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. एकूण 38,693 मतदारांपैकी 26,014 मतदारांनी मतदान करून 67.23 टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत 8.72 टक्के मतदान झाले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत मतदान 35.84 टक्क्यांवर पोहोचले, तर 3.30 वाजेपर्यंत 49.58 टक्के मतदारांनी मतदान केले. अखेरीस दिवसभरातील एकूण मतदान 67.23 टक्क्यांवर स्थिरावले. डहाणू गाव, आगर आणि लोणीपाडा भागात रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. 13 प्रभागांतील 27 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी नागरीकांनी उत्साहाने मतदान केले.
डहाणू नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये सेंट मेरीज हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदार यादीतील घोळामुळे मतदारांना मतदानापासून रोखण्यात आले. काही मतदारांची नावे दोन ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागांच्या यादीत असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. यात आमची काय चूक? असा प्रश्न संतप्त मतदारांनी उपस्थित केला. दोन यादीत नावे असूनही मतदान नाकारले जात असल्याने अनेक मतदार नाराज होते. मतदान केंद्र शोधण्यासाठी काही मतदारांची अक्षरशः दमछाक झाली.
डहाणू गावातील मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. दिव्यांग मतदारांनीही मतदानात सक्रिय सहभाग घेतला. मल्याण येथील ज्येष्ठ मतदार तुकाराम बारी (वय 75) यांनी आतातरी बदल व्हावा म्हणून मतदानाला आलो असे सांगत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभाग क्रमांक 11 डहाणू गाव येथे शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मतदान केंद्रात भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने वाद निर्माण झाला होता.