

वाडा : वाडा तालुक्यातील बिलोशी गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका फोम कंपनीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. फोम हे अतिशय ज्वलनशील उत्पादन असून अग्निशमन यंत्रणा येईपर्यंत कंपनी जळून खाक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाडा तालुक्यातील फोम कारखान्यात नजिकच्या काळातील आगीची ही जवळपास सहावी घटना असून आगीचे कारण असणारी शॉकसर्किट ही जणू नैसर्गिक आपत्ती बनली आहे.
बिलोशी गावातील काठोलेपाडा भागात सहारा फोम नावाची कंपनी अनेक वर्षांपासून असून भर लोकवस्तीत असणाऱ्या या कंपनीला रविवारी पहाटे 5 च्या सुमारास आग लागली. फोम व त्यासाठी वापरले जाणारे केमिकल अतिशय ज्वलनशील असल्याने कंपनीची पूर्णपणे राखरांगोळी झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नव्हते. कंपनीच्या डोक्यावरून उच्चदाबाच्या वाहिन्या गेल्या असून नजीकच गॅस लाइन देखील गेल्याने भीती दुप्पट वाढली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बिलोशी गावासह, गांधरे औद्योगिक क्षेत्र, दुपारेपाडा अशा अनेक फोम उत्पादन करणाऱ्या कारखान्यात आगीच्या घटना घडल्या असून शॉकसर्किट हेच समान कारण सर्वांमध्ये ऐकायला मिळते. वाडा नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा मोठी आग आटोक्यात आणायला असमर्थ ठरत असून पालघर व वसई येथून गाड्या येईपर्यंत होत्याचे नव्हते होऊन जाते असा अनुभव आहे.
सापने गावात नुकताच टायर कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर लगेच घडलेल्या या प्रकाराने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कंपनीतील स्वतःच्या अग्निशमन यंत्रणेचे थोतांड चव्हाट्यावर आले आहे. कामगारांच्या सुरक्षेसह लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत तालुक्यातील कारखाने एखाद्या अणूबॉम्ब प्रमाणे झाले आहेत असे लोकांचे म्हणणे आहे.