

विरार ः विरार पश्चिम आणि विरार पूर्वेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या उड्डाणपुलावर गेल्या काही महिन्यांपासून तीव्र वाहतूक कोंडी होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी परतीच्या गर्दीच्या तासात या पुलावर वाहनांची लांबच लांब रांग लागत आहे.
दररोज हजारो वाहनं दुचाकी, रिक्षा, कार आणि शाळांच्या बस या पुलावरून जातात. मात्र, वाहतुकीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण नसल्यामुळे ही वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना व्यापारी आस्थापने, शाळा आणि निवासी इमारती असल्याने या परिसरात नेहमीच गर्दी असते. परिणामी, शाळकरी मुलांना सकाळच्या वेळी रस्त्यावर थांबावं लागतं, तर कामावर जाणाऱ्या नागरिकांचा अमूल्य वेळ वाया जातो.
या पुलावरून जाण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागावा इतकं अंतर असूनही, कोंडीच्या वेळी नागरिकांना एक ते दीड तास रांगेत थांबून रहावं लागतं. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. काही वेळा रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा किंवा शालेय बससुद्धा या गर्दीत अडकतात, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक विभागाने काही वेळा पोलिसांची नेमणूक केली असली तरी, ती पुरेशी ठरत नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत वाहतूक पोलीस नियमित हजर राहत नाहीत. काही वाहनचालक सिग्नल किंवा शिस्त न पाळता दुचाकी रस्त्याच्या कडेला चढवतात, रिक्षा मधेच थांबवतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
वाहतुकीच्या समस्येबरोबरच रस्त्याच्या कडेने असलेल्या पादचारी मार्गाची दुरवस्था, तुटलेली भिंती आणि अडथळे हे देखील लोकांच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरत आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर होते, कारण पाणी साचल्यामुळे रस्ते घसरडे होतात आणि अपघातांची शक्यता वाढते.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका आणि वाहतूक विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांनी उड्डाणपुलाखाली पर्यायी मार्ग तयार करण्याची आणि वाहतूक नियोजन सुधारण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाने ठोस पावले उचललेली नाहीत.
आम्ही रोज या कोंडीत अडकलो जातो. पुलाचा विस्तार आणि योग्य नियोजन केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
संदीप पाटील, व्यापारी