

सफाळे: पालघर जिल्ह्यातील लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाच्या कामाला संथ गती असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-३ अंतर्गत सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी मंजूर ३,५७८ कोटी रुपयांपैकी तब्बल २,६९७.४३ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
मात्र, प्रकल्प पूर्ण होण्याची ठोस अंतिम तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे ‘खर्चाची आकडेवारी उपलब्ध आहे; मग काम पूर्ण होण्याच्या तारखा का नाहीत?’ असा सवाल प्रवासी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, चौपदरीकरणासाठी नवीन रेल्वेमार्गांवर एकूण ९१ पूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यापैकी ७० पुलांचे काम पूर्ण झाले असून अद्याप २१ पुलांची कामे बाकी आहेत. मंजूर निधीपैकी सुमारे ७५ टक्के निधी खर्च झालेला असतानाही प्रकल्पातील महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत.
विरार ते डहाणू दरम्यान नव्या रेल्वेमार्गांवर बांधण्यात येणाऱ्या फलाटांच्या कामाबाबतही माहिती अधिकारात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फलाट बांधकाम कधी सुरू झाले आणि ते कधी पूर्ण होणार, याबाबतची माहिती विचारण्यात आली असता एमआरव्हीसीकडून असे उत्तर देण्यात आले आहे.
चौपदरीकरणानंतर नव्या मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी फलाट आणि प्रवासी सुविधांची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रकल्पातील या महत्त्वाच्या कामाचेच निश्चित वेळापत्रक उपलब्ध नसल्याने प्रकल्प नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाचे काम मार्च २०२३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र ही मूळ मुदत केव्हाच उलटून गेली आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या पूर्णत्वाची मुदत पुढे ढकलण्यात आली. माहितीनुसार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
प्रवाशांना दिलासा कधी?
विरार-डहाणू रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून सध्याच्या दोन मार्गांवर रेल्वे वाहतुकीचा मोठा ताण आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियोजन अधिक सक्षम होण्याबरोबरच अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.