

सफाळे : डहाणू मार्गावरील प्रवाशांना दिलासा म्हणून 15 डब्यांची लोकल सेवा अखेर महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आली. या सेवेमुळे लोकल गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
शुक्रवारी सकाळी 5.35 मिनिटांनी ही लोकल धावली. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे विशेषतः या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.डहाणू लोकल सुरू होऊन तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली असताना या मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे 12 डब्यांच्या लोकलमध्ये प्रवास करणे अत्यंत कठीण झाले होते.
या पार्श्वभूमीवर 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था यांसह विविध प्रवासी संघटनांनी 2018 पासून रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता.
शुक्रवारपासून 15 डब्यांची लोकल सुरू करण्यात आली. प्रवाशांनी या सेवेचे स्वागत करतानाच सकाळ व संध्याकाळच्या पिक अवरमध्ये आणखी 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे. पहाटे 4:35 ची चर्चगेट लोकल तसेच संध्याकाळी गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने केळवे रोड, सफाळे व वैतरणा स्थानकांवरील प्रवाशांना चढणेही कठीण होते.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गासाठी ही सेवा अधिक सोयीची व्हावी, यासाठी पिक अवरमध्ये अतिरिक्त फेऱ्या सुरू करणे अत्यावश्यक असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
मुंबईकडे (अप)
डहाणू 07:17 सकाळी
डहाणू 13:20 दुपारी
डहाणू 17:10 संध्याकाळी
डहाणू 22:45 रात्री
डहाणूकडे (डाऊन)
विरार 05:35 सकाळी
चर्चगेट 10:03 सकाळी
विरार 15:00 दुपारी
विरार 20:30 रात्री