

विक्रमगड ः यावर्षी अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान अजूनही शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ताजे असतानाच, पर्याय म्हणून विक्रमगड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीकडे वाटचाल सुरू केली आहे.
अतिवृष्टी, बगळ्या, करप्या रोग आदी संकटांमुळे भाताचे उत्पादन घटल्याने झालेला आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील शेतकरी गवार , टोमॅटो, वांगी, मुळा, कोथिंबीर, पालक , काकडी, मेथी तसेच वेलवर्गीय पिके तसेच सफेद कांदा या पिकांकडे वळताना दिसत आहेत. या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी साठा उपलब्ध असल्याने फायदा घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून जलसंधारणाच्या विविध कामांमुळे भूजल पातळी देखील वाढली आहे.
नदी ,ओहाळांमध्ये पाणीसाठा समाधानकारक असल्याने रब्बी हंगामात सुद्धा पाणी उपलब्ध राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पिकांची नियोजनबद्ध लागवड सुरू केली आहे. भाजीपाल्याला चांगली मागणी आणि नगदी परतावा जलद मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक शाश्वततेचा आधार मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे. काही भागात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ड्रिप सिंचनाचा वापर वाढताना दिसत आहे.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच भाजीपाला शेतीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, बियाणे अनुदान, बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारने अधिक पाठबळ द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. तोट्यात जाणाऱ्या भात शेतीला पर्याय म्हणून भाजीपाला लागवडीकडे वाढत असलेला कल हा तालुक्यातील शेती उत्पादनाचा समतोल राखण्यास आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास मदत करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.