

विरार ः वसई-विरार परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरांचे अनियंत्रित वेग, वाहतूक नियमांकडे संपूर्ण दुर्लक्ष आणि बेफाम ड्रायव्हिंग यामुळे अपघातांचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. मुख्य महामार्ग असो वा परिसरातील अरुंद मार्ग, सर्वत्र धावणाऱ्या टँकरांनी नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला असुरक्षित केले असून रस्त्यावर सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडील अपघातांनी हा प्रश्न अधिक गंभीर केला आहे. शनिवारी विरारमधील नारंगी फाटकाजवळ एका वेगाने धावणाऱ्या पाणी टँकरने स्कूटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 17 वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप उसळला असून नागरिकांनी टँकर चालकांच्या निर्बंधहीन वागणुकीचा आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा जोरदार निषेध केला.
मागील काही महिन्यांपासून टँकर अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. 31 जुलै 2025 रोजी नालासोपाऱ्यात मंदाकिनी खांबे (44), 22 सप्टेंबरला विरारमधील प्रभात नाईक (55) आणि 29 नोव्हेंबरला केळकुंभ (17) या तरुणाचा मृत्यू अशा अनेक दुर्घटनांनी नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे.
स्थानिकांचा ठाम आरोप आहे की शहरात धावणाऱ्या टँकरांवर कोणतेही सक्षम नियंत्रण नाही. अनेक टँकर बिननोंदणी, बिनक्लीनर, अपूर्ण कागदपत्रे आणि अनुभवहीन चालक यांच्या ताब्यात बेधडकपणे धावत आहेत. वाहनांची स्थिती, गतीमर्यादा आणि सुरक्षा तपासणी याबाबतही कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याने अपघातांची संख्या सतत वाढत आहे.
नागरिकांच्या तक्रारी असूनही जमिनीवर काहीच सुधारणा न झाल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेकडे टँकर चालकांच्या बेपर्वाईबाबत पूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या, मात्र कठोर कारवाईचा अभाव असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे. परिणामी रस्ते जीवघेणे बनत चालले असून नागरिक सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे चिंतेत आहेत.
नागरिकांची प्रशासनाकडे स्पष्ट मागणी आहे शहरातील सर्व पाणी टँकरांची नियमित तपासणी, गती नियंत्रण, कागदपत्रांची सक्ती, आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई. हे उपाय कठोरपणे राबविल्यासच टँकरराजाला वेस लागेल आणि वाढते अपघात थांबतील, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.