Vasai Virar Roads: बांधकामांच्या विळख्यात वसई-विरारमधील रस्त्यांची दुरवस्था!

रस्त्यांवर साचलेे चिखलाचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Vasai Virar Roads
Vasai Virar RoadsPudhari
Published on
Updated on

विरार: वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी बांधकामांचे साहित्य, माती आणि चिखल रस्त्यावर पसरत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडली असून रस्त्यांवर साचलेले घाण पाणी आणि चिखलामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नालासोपारा बेट परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून बांधकामांच्या ठिकाणाहून माती आणि चिखल रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पावसाच्या पाण्यासोबत ही माती रस्त्यावर पसरत असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कॅपिटल मॉल परिसरातही रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

Vasai Virar Roads
Palghar News: पालघरमध्ये माता-बाल आरोग्य सेवेला बळ; २०१४-१५ च्या तुलनेत बालमृत्यूत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट

बांधकामाच्या ठिकाणाहून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल साचत आहे. त्यातच पावसाचे पाणी मिसळल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय होत आहे. परिणामी पायी चालणाऱ्या नागरिकांना तसेच दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे धोकादायक ठरत आहे.

गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात माती जमा होत असल्याने निचऱ्याची समस्याही गंभीर बनली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. या बांधकामांमधून निघणारी माती आणि इतर बांधकाम साहित्य रस्त्यावर येत असल्याने पावसाच्या पाण्यासोबत ते गटारांमध्ये वाहून जाते.

Vasai Virar Roads
Virar Dahanu Railway Project: कोट्यवधींचा खर्च झाला; विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण कधी होणार?

परिणामी गटारे तुंबण्याचे प्रकार वाढत असून पावसाळ्यात काही भागांत जलभरावाची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. आचोळे रोडचीही अशीच अवस्था झाल्याचे चित्र आहे. या भागात सुरू असलेल्या बांधकामांमुळे रस्त्यावर माती आणि चिखल पसरला आहे. बांधकामस्थळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या चाकांना लागलेली माती रस्त्यावर येत असल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छ आणि धोकादायक बनत आहे.

संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावर माती, चिखल किंवा बांधकामाचे साहित्य पडणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांवर पसरलेला चिखल आणि घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असून पादचाऱ्यांच्या कपड्यांवर वाहनांमुळे घाण पाणी उडण्याचे प्रकारही घडत आहेत.

बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

महापालिका प्रशासनाने केवळ बांधकामांना परवानगी देऊन थांबण्याऐवजी प्रत्यक्ष बांधकामस्थळांची पाहणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर चिखल, माती किंवा बांधकाम साहित्य टाकणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. रस्ते नागरिकांच्या वापरासाठी आहेत; बांधकामस्थळांचा विस्तार करण्यासाठी नव्हेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news