

विरार : पुढारी वृत्तसेवा
वसई-विरार शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या आरोग्याबरोबरच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर आणि सार्वजनिक वर्दळीच्या भागांमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, पाण्याचा अभाव, तुटलेली दारे तसेच नियमित साफस-फाईचा अभाव असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह बाहेर पडणाऱ्या कुटुंबांना या गैरसोयीचा मोठा सामना करावा लागत आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे चित्र दिसून येते. काही स्वच्छतागृ हांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसते, तर काही ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे आत जाणेही कठीण होते. स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करण्याची जबाबदारी असतानाही संबंधित यंत्रणांकडून याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे काही सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या मागील बाजूस मोकळी जागा असल्याने त्या ठिकाणी मद्यपान करणारे तसेच नशा करणाऱ्या व्यक्तींचा वावर असल्याच्या तक्रारी आहेत.
अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्तींची गर्दी होत असल्याने परिसरातील वातावरण असुरक्षित बनते. परिणामी, रात्रीच्या वेळेस महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहात जाण्यासही भीती वाटते. स्वच्छतागृहांची दुरवस्था हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न राहिलेला नसून, महिलांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर विषय बनला आहे.
शहरात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि विविध कामानिमित्त दररोज हजारो महिला घराबाहेर पडतात. प्रवासादरम्यान किंवा बाजा-रपेठेत खरेदीसाठी गेल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता भासते. मात्र, स्वच्छतागृहांची अस्वच्छ अवस्था आणि परि-सरातील काही व्यक्तींचा संशयास्पद वावर पाहता अनेक महिला या सुविधेचा वापर करण्याचे टाळतात. विशेषतः रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसणे, सुरक्षारक्षकांचा अभाव आणि परिसरात पोलिसांची गस्त नसणे यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र होत आहे.
महापालिकेने शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची नियमित साफसफाई, पाण्याची उपलब्धता, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि दुरुस्तीची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. स्वच्छता गृहांच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागांमध्ये मद्यपान किंवा नशा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधणे गरजेचे आहे. तसेच रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि नियमित गस्त सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
केवळ स्वच्छतागृहांची उभारणी करून महापा-लिकेची जबाबदारी संपत नाही, तर त्यांची स्वच्छता, सुरक्षितता आणि नियमित देखभाल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. "सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे ही महिलांची गरज आहे. मात्र, अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गैरसोय आणि तुटलेली दारे यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.
रात्रीच्या वेळी तर स्वच्छतागृहांच्या परिसरात मद्यपान करणारे आणि नशा करणारे लोक दिसत असल्याने तिथे जाण्याचीही भीती वाटते. महापालिकेने महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत.
- सुनिता संखे, नोकरी करणारी महिला