Vasai Virar tax hike: वसई-विरार मनपाचा लाभकराच्या माध्यमातून करवाढीचा प्रयत्न; भाजप आक्रमक

मालमत्ता करात 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ
Vasai Virar tax hike
Vasai Virar tax hikePudhari
Published on
Updated on

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा 4 हजार 200 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प 9 मार्च 2026 रोजी सादर केला असून यामध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत मोठी वाढ सुचवण्यात आली होती. सुरुवातीला मालमत्ता करात 15 टक्के आणि पाणीपट्टीत थेट दुप्पट वाढ सुचविली असताना, स्थायी समितीसमोर ही करवाढ मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली होती.

मात्र, प्रत्यक्षात 16 जानेवारी 2025 रोजीच्या प्रशासकीय ठराव क्रमांक 1997 नुसार ‌‘पाणीपुरवठा लाभकर आणि ‌‘मलप्रवाह सुविधा लाभकर‌‘ लागू करून नागरिकांवर 20 टक्क्यांहून अधिक करवाढीचा बोजा लादण्यात आला आहे.

Vasai Virar tax hike
Karvanda season: पालघर जिल्ह्यात डोंगराची काळी मैना ‌‘करवंद‌’चा बहर

या निर्णयाविरोधात आता भाजपचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून हा अन्यायकारक कर तातडीने रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे.

महापालिकेने पाणीपट्टी वाढीचे समर्थन करताना असे स्पष्ट केले होते की, एमएमआरडीए आणि एमजीपीकडून 13 रुपये 80 पैसे प्रति लिटर दराने पाणी खरेदी करून ते नागरिकांना अवघ्या 8 रुपयांत दिले जाते.

हा आर्थिक फरक भरून काढण्यासाठी आणि प्रस्तावित धरण प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्यासाठी पाणीपट्टी 16 रुपये करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. परंतु, विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी या दाव्यांना आव्हान दिले असून, शहरातील अनेक भागांत आजही नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याकडे लक्ष वेधले आहे.

याशिवाय, शहरातील मलनिःसारण आणि भुयारी गटार योजनेची अवस्था अत्यंत बिकट असतानाही नागरिकांकडून ‌‘मलप्रवाह सुविधा लाभकर‌‘ वसूल करणे हे लोकशाहीला धरून नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

Vasai Virar tax hike
Thane teachers salary issue: अतिरिक्त ठरलेले शिक्षक पगारापासून वंचित; आमदार संजय केळकर यांची उप संचालकांशी चर्चा

वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या वसई-विरारच्या नागरिकांवर अशा प्रकारे 20 टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता कराची वाढ लादणे अत्यंत अन्यायकारक आहे. प्रशासनाने आधी नागरिकांना दर्जेदार आणि पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा व मलनिःसारण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यानंतरच अशा करांचा विचार करावा, अशी स्पष्ट भूमिका मनोज पाटील यांनी मांडली आहे.

प्रशासनाने या जनभावनेची दखल घेऊन हा अन्यायकारक कर तातडीने रद्द केला नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. या पत्रामुळे आता वसई-विरार महापालिका प्रशासन करवाढीच्या या निर्णयावर काय भूमिका घेते, याकडे सर्व वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news