

वसई : वसई विरार महापालिकेत 115 जागासाठी 15 जानेवारी रोजी निवडणुक होत असून, या निवडणुकीत भाजप, शिंदेची शिवसेना व श्रमजीवी संघटना यांची महायुती झालेली आहे. तर बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांच्यात अनेक जागांवर समझोता झालेला आहे. या निवडणुकीत उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहे. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली असून, काही प्रमाणात बंडाचे निशाण फडकवल्याचे चित्र सर्वच पक्षात पाहायला मिळत आहे.
आज प्रचार काळातील शेवटचा रविवार म्हणून सर्वच पक्षांनी आपले नेते आणि उमेदवार यांच्यासह मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला. उमेदवारांनी डोअर टू डोअर मतदारांशी संवाद साधण्याबरोबरच चौकसभा आणि रॅलीद्वारा प्रचार यंत्रणा राबविण्यात आली.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, माजी महापौर नारायण मानकर यांनी विविध प्रभागात जाऊन उमेदवारांचा प्रचार केला. तर भाजप शिवसेना महायुतीचे नेते, खासदार हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, आमदार विलास तरे यांनी विविध प्रभागात जाऊन आपल्या उमेदवारांसाठी मतदारांना साकडे घातले.
वसई विरार महानगरातील एक महत्वाचे उपनगर असलेल्या नवघर माणिकपूर शहरात आज स्नेहा दुबे पंडित आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपापल्या उमेदवारांसाठी संपूर्ण दिवस कसून प्रचार केला. विधानसभेच्या परिवर्तनातून वर्षभरात काय साध्य झाले? यावर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा जोर राहिला. तर विधानसभेत परिवर्तन घडवले तसेच परिवर्तन महापालिकेतही घडवा या मुद्द्यावर महायुतीच्या नेत्यांनी यावेळीभर दिलेला दिसून आला.