Vasai Virar heavy rain : वसई-विरारला तडाख्याने जनजीवन विस्कळीत

पावसाचा हाहाकार : वीज, नेटवर्क, रेल्वे आणि रस्तेसेवा ठप्प
Vasai Virar heavy rain
सोमवारच्या पावसाच्या तडाख्याने वसई रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसर असा जलमय झाला. pudhari photo
Published on
Updated on

वसई : वसई-विरार शहरावर सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भाग कंबरेभर पाण्याखाली गेले आहेत. दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांच्या हालात अधिकच भर पडली. वीज नसल्यामुळे मोबाईल टॉवर्सही बंद पडले आणि इंटरनेट व मोबाईल नेटवर्क कोलमडल्याने नागरिकांचा परस्परांशी संपर्कही तुटला.

आधीच पाण्याखाली गेलेल्या भागांत सोमवारी पुन्हा मुसळधार पावसाची भर पडल्याने वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातील अनेक सखल भाग जलमय झाले. पालिकेची परिवहन सेवा आणि ऑटोरिक्षा बंद असल्याने नागरिकांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रवास करावा लागला. अनेक दुचाकी व चारचाकी वाहने पाण्यात बंद पडून रस्त्यांवरच सोडून द्यावी लागली.

Vasai Virar heavy rain
Pune Water Crisis: पुण्यात पाणी संकटाचा उद्रेक

पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा देखील विस्कळीत झाली. नालासोपारा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर दीड ते दोन फूट पाणी साचल्याने सलग दुसऱ्या दिवशी अनेक लोकल गाड्या वसईहूनच मुंबईकडे सोडण्यात आल्या. परिणामी विरार आणि नालासोपारा येथील हजारो प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. अनेक गाड्या अनिश्चित वेळेत धावत असल्याने प्रवाशांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागली.

वसई पूर्वेतील वाघराळपाडा आणि मिठागर वस्ती तिसऱ्या दिवशीही पाण्याखालीच होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाने बोटीच्या साहाय्याने तेथे औषधे व अन्नपाकिटे पोहोचविली. मधुबन, सनसिटी-गास रोड, सागरशेत, देवतलाव यांसह अनेक भाग जलमय झाले होते. सायंकाळी जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व वीजखांब कोसळल्याच्या घटनाही घडल्या.

दरम्यान, महापौर अजीव पाटील आणि आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यांनी भरपावसात प्रत्यक्ष पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने निचऱ्याच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Vasai Virar heavy rain
Vasai Virar Heavy Rain | रात्रभराच्या मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; महापालिकेच्या '१०० टक्के नालेसफाई'च्या दाव्याची पुन्हा पोलखोल

महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, शहरातील १०५ ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अग्निशमन दल व रेस्क्यू पथकांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, अग्निशमन वाहने आणि लाईफबोटींच्या साहाय्याने २१० नागरिकांची सुरक्षित सुटका केली. तसेच पूरग्रस्त नागरिकांना ३,५४१ अन्नपाकिटांचे वितरण करण्यात आले. दरडप्रवण क्षेत्र व धोकादायक इमारतीतील नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलवून त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली.

महापालिकेने शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणी ५६ पंप कार्यान्वित केले असून गटारे, नाले, मॅनहोल आणि जलवाहिन्यांमधील कचरा काढून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news