

पालघरः पालघर जिल्ह्यात गणेश उत्सवाच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू असून पर्यावरण पुरक गणेशोस्तवासाठी ग्रामीण तसेच शहरी भागात नियोजन केले जात आहे. वसई-विरार महानगर पालिकेनेही पर्यावरण पूरक गणेशोस्तवासाठी कंबर कसली आहे.
वसई-विरार मनपाकडून यासंबधी बैठक घेऊन संबधीतांना सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तींच्या सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, फिरते हौद, मूर्तींच्या वाहतुकीची सोय, मंडप उभारणी, पुरेशी दिवाबत्ती आणि सुरक्षा व्यवस्था अशा सर्वच स्तरांवर पालिकेने व्यापक नियोजन केले आहे.
मागील वर्षी कृत्रिम तलावांना नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, महापालिकेने यावर्षी कृत्रिम तलावांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे. त्यानुसार शहरातील नऊ प्रभागांमध्ये एकूण १२८ कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वसई-विरार महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर विशेष भर दिला आहे.
मागील वर्षी शहरातील एकूण विसर्जनापैकी तब्बल ७९ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. हाच सकारात्मक कल कायम राखण्यासाठी यंदा पालिकेने जय्यत तयारी केली असून, १२८ कृत्रिम तलावांसोबतच प्रभागनिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ फिरते विसर्जन हौद तयार केले जाणार आहेत.
तसेच कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्तींचे बंद दगडखाणींच्या ठिकाणी सुरक्षित अंतिम विसर्जन करण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शहरातील मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मारंबळपाडा, किल्ला बंदर,पाणजू नायगाव, पाचूबंदर, नारिंगी, वर्सोवा खाडी जेट्टी अशा विविध जेट्टींवर, तसेच मधूबन व वालईपाडा खदान या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व विसर्जनस्थळी मूर्ती संकलन केंद्रे, वैद्यकीय मदत कक्ष, आरतीसाठी स्वतंत्र जागा, प्रशिक्षित जीवरक्षक, दिवाबत्ती आणि मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.
उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यास सक्त मनाई असल्याने, नागरिकांनी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उत्सवादरम्यान शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे आणि स्वच्छतेवर भर देणे यावरही विशेष लक्ष दिले जात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कृत्रिम तलावाला प्रतिसाद
मागील वर्षी वसई-विरारमध्ये विविध दिवसांच्या एकूण ३२,८७७ सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यातील २५,९४० मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत, तर केवळ ६,९३७ मूर्तींचे विसर्जन समुद्रकिनारे किंवा जेट्टींवर झाले होते.
विसर्जनस्थळी होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने अधिक गर्दीच्या ठिकाणांची माहिती घेऊन तेथे कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे, ज्यामुळे गर्दीचे योग्य विभाजन होऊन नागरिकांना विसर्जन प्रक्रिया अत्यंत सोपी, सुलभ आणि सुरक्षितपणे पार पाडता येईल.