

नविद शेख
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत वाढलेल्या अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर अखेर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांच्या हद्दीतील महामार्गालगतची तब्बल ४५० अतिक्रमणे निश्चित करून त्यावर मार्किंग करण्यात आले आहे.
येत्या आठवडाभरात ही अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू होणार असल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग अधिनियमानुसार संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत अतिक्रमणाबाबत बाजू मांडणे आवश्यक आहे. तसेच सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महसूल विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले होते. महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेताना कारवाईला होत असलेल्या विलंबाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असून कार्यक्षेत्राचे कारण देऊन जबाबदारी टाळता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा स्पष्ट अहवाल (Action Taken Report) सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रानुसार अतिक्रमणांची पाहणी करून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. वन विभागाच्या जागेतील अतिक्रमणांबाबतही अहवाल मागवण्यात आला आहे.
पाहणीनंतर निश्चित झालेल्या अतिक्रमणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून आता प्रत्यक्ष तोडक कारवाईची तयारी सुरू आहे. कारवाईसाठी जेसीबी, पोकलेनसह आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध केले जात आहे.
पोलीस बंदोबस्त मिळताच पुढील आठवड्यात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.या मोहिमेमुळे महामार्गानजीकचे अतिक्रमण दूर होवून परिसर मोकळा होण्यास मदत होणार आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास खर्च व दंड वसुली
राष्ट्रीय महामार्ग (जमीन आणि वाहतूक) नियंत्रण कायद्याच्या कलम २६ (२) अंतर्गत अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास कलम २६ (६) अंतर्गत प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येणार असून, या कारवाईचा खर्च तसेच दंडाची रक्कम संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे महामार्गालगत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दुकानांसह अन्य बांधकामांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील महामार्गा लगतच्या साडे चारशे अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महसूल, वनविभागासोबत समन्वय साधला जात आहे.तोडक कारवाईसाठी आवश्यक यंत्र सामग्री, मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्त उपलब्धतेसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. येत्या आठवड्यात तोडक कारवाईला सुरुवात केली जाईल.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.