Palghar News : वसई-विरारमध्ये सापांचा वाढता वावर ठरतोय चिंताजनक

पावणेदोन वर्षांत ५७१ सर्पदंशाच्या घटना, दोन महिन्यांत तीन महिलांचा मृत्यू
Vasai Virar Snakebite Cases
Vasai Virar Snakebite Casespudhari photo
Published on: 
Updated on: 

खानिवडे : वसई-विरार शहरातील नागरी वस्त्यांसह ग्रामीण भागातही सापांचा वावर वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. कापणीचा हंगाम, वाढती उष्णता आणि जंगलांमधील नैसर्गिक अधिवासावर होणारे अतिक्रमण यामुळे साप मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पावणेदोन वर्षांत वसई-विरारच्या शहरी आणि ग्रामीण भागात मिळून ५७१ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांत सर्पदंशामुळे तीन महिलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वसई-विरार परिसरात खासगी इमारती आणि विविध बांधकाम प्रकल्पांसाठी जंगलपट्ट्यांवर अतिक्रमण होत असल्याने वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच बदलते हवामान, वाढती उष्णता आणि पाण्याच्या स्रोतांची कमतरता यांमुळे साप अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे वळत असल्याचे सर्पमित्रांकडून सांगण्यात येत आहे. नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे यांसारख्या विषारी सापांसह विविध बिनविषारी सापही घरांच्या परिसरात, अडगळीच्या खोल्यांत, झाडाझुडपांत आणि वाहनांजवळ आढळून येत आहेत.

Vasai Virar Snakebite Cases
Palghar Fire : वाड्यातील जीनियस पेंट कंपनीला भीषण आग

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या कालावधीत वसई-विरारच्या शहरी भागात ३६६, तर ग्रामीण भागात २०५ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असली, तरी कापणीच्या हंगामात शेतात काम करताना तसेच घरातील अडगळीची ठिकाणे स्वच्छ करताना सर्पदंशाचा धोका वाढतो. गवत, लाकडे किंवा इतर वस्तू हलवताना अथवा अंधाऱ्या जागेत पाय ठेवताना सापाच्या संपर्कात येण्याची शक्यता असते.

Vasai Virar Snakebite Cases
India Childhood Blindness: देशात ९३ लाख मुले दृष्टिबाधित; ७५ टक्क्यांहून अधिक दृष्टिदोष टाळणे शक्य

वसईच्या डोंगराळ आणि शेतीप्रधान भागातही सापांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. शेतीची कामे करताना साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न केल्याने धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्पदंश झाल्यास तातडीने उपचार घ्या

सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी उशीर होणे किंवा दंश झाल्याचे वेळीच लक्षात न येणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे सर्पदंशाचा संशय आल्यास लक्षणे दिसण्याची वाट न पाहता तातडीने जवळच्या रुग्णालयात जावे. पालिकेच्या रुग्णालयांत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्पदंशावरील उपचारांसाठी आवश्यक लसी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दोन महिन्यांत तीन महिलांचा सर्पदंशाने मृत्यू

सर्पदंशाच्या घटनांचे गांभीर्य अलीकडील तीन मृत्यूंमुळे अधोरेखित झाले आहे. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी विरारमधील आगाशी परिसरातील सोमाडी येथील रहिवासी शैला ऊर्फ चार्लेटी घोन्साल्विस ( ५१) यांना स्वयंपाकघरात विषारी सापाने दंश केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी वसई पूर्वेतील राजावळी-काजूपाडा येथे ललिता साटे (२७) यांचा झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला होता. तर १० ऑगस्ट २०२६ रोजी विरार पूर्वेतील उसगाव-भाताणे येथे शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने सुमन मारुती कोम (५३) यांचा मृत्यू झाला होता. घरात आणि शेतात काम करतानाही सर्पदंशाचा धोका असल्याचे या घटनांतून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news