Vasai Historical Places : गतवैभवाच्या पाऊलखुणा जपणारी आगाशी-सोपारा बंदरे विस्मृतीत

वसईच्या वैभवशाली सागरी व्यापाराच्या पाऊलखुणांचा शोध; दुर्लक्षित ऐतिहासिक ठेव्याच्या अभ्यासाची गरज
Vasai Historical Places
Vasai Historical Placespudhari photo
Published on: 
Updated on: 

खानिवडे : विश्वनाथ कुडू

नारळी-पोफळीच्या हिरव्यागार बागांनी नटलेल्या वसईच्या भूमीला निसर्गसौंदर्याबरोबरच समृद्ध ऐतिहासिक आणि व्यापारी वारशाची देणगी लाभली आहे. आजच्या आधुनिक नागरीकरणाच्या झपाट्यात वसईची ऐतिहासिक ओळख काहीशी धूसर होत असली, तरी या भूमीच्या मातीत आणि जुन्या वास्तूंमध्ये तिच्या गतवैभवाच्या अनेक खुणा आजही दडलेल्या आहेत.

याच इतिहासातील एक महत्त्वाचा, मात्र काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेला अध्याय म्हणजे आगाशी आणि सोपारा परिसरातील प्राचीन बंदरांचा. एकेकाळी सागरी व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारी ही बंदरे आज भूगोलातील बदल, नैसर्गिक स्थित्यंतरे आणि कालौघामुळे इतिहासाच्या विस्मृतीत गेली आहेत.

Vasai Historical Places
Thane BMC Bomb Threat : ठाणे पालिका मुख्यालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी

वसईच्या उत्तरेस सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले आगाशी हे गाव एकेकाळी बंदर आणि व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. सोळाव्या आणि सतराव्या शतकातील ऐतिहासिक संदर्भांमध्ये आगाशी बंदराचा उल्लेख चांगला महसूल मिळवून देणारे बंदर म्हणून आढळतो. या बंदराचा काही भाग पुढे भाटीबंदर या नावानेही ओळखला जाऊ लागला. आज आगाशीची ओळख प्रामुख्याने नागरी वस्ती आणि धार्मिक स्थळांशी जोडली गेली असली, तरी या परिसराने अनुभवलेले सागरी व्यापारी वैभव मोठे होते.

मुंबई विद्यापीठातील अभ्यासक अरुणाचलम यांनी मांडलेल्या संशोधनपर अनुमानानुसार, सध्याच्या रेल्वेमार्गाचा वसईच्या खाडीपासून वैतरणा नदीपर्यंतचा परिसर पूर्वी खाडी आणि बेटांनी व्यापलेला होता. मुंबईच्या जुन्या ऐतिहासिक संदर्भांमध्येही या भागाचा उल्लेख खाडी आणि बेटांचा प्रदेश म्हणून आढळतो. त्यामुळे आज जिथे रेल्वे मार्ग, रस्ते आणि नागरी वसाहती दिसतात, त्या भूप्रदेशाचे पूर्वीचे स्वरूप पूर्णत: वेगळे होते, असे ऐतिहासिक संदर्भांवरून लक्षात येते. त्या काळात सागरी मार्गाने होणारी मालवाहतूक आणि व्यापारी दळणवळण यांना विशेष महत्त्व होते. वाढत्या व्यापाराच्या गरजा आणि नव्याने निर्माण होणारे आरमारी संघर्ष यामुळे वसई परिसरातील बंदरांचे महत्त्व वाढले होते.

Vasai Historical Places
Jewellery Shop Firing : १० कोटींसाठी माहीम सराफावर गोळीबार

आगाशी, भाटी, तुसखाडी, राजणी, बोळींज, सोपारे, वाघोली, भुईगाव आणि बंदरवाडी अशा अनेक लहान-मोठ्या बंदरांमधून मालाची वाहतूक होत असे. ही बंदरे केवळ मालाच्या चढ-उताराची केंद्रे नव्हती, तर त्या काळातील स्थानिक अर्थव्यवस्था आणि व्यापारी संबंधांचा महत्त्वाचा आधार होती.

आगाशी परिसरातील प्राचीन बंदरे, नामशेष झालेला माडीकोट, महिकावतीच्या बखरीतील संदर्भ आणि पेशवेकालीन वाडे हे या परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात. इ. स. १७३७ मधील वसई मोहिमेच्या रणसंग्रामात सातत्याने कर्तृत्व गाजविणारे शंकरजी केशव फडके हे त्यातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी वसई परिसरातील अनेक प्राचीन आणि पौराणिक महत्त्व असलेल्या तीर्थक्षेत्रांतील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी योगदान दिल्याचे संदर्भ आढळतात. आगाशी परिसरातील पेशवेकालीन वाडे आणि मंदिरे यांचा स्वतंत्रपणे अभ्यास होणे आवश्यक आहे.

अपरिचित इतिहास उजेडात येणार

महिकावतीच्या बखरीतील उल्लेख, पेशवेकालीन पत्रव्यवहार, जुन्या महसुली नोंदी, स्थानिक घराण्यांकडील कागदपत्रे, जुन्या वास्तूंचे अवशेष व ज्येष्ठ नागरिकांकडील मौखिक माहिती संकलन केल्यास वसईच्या सागरी व्यापाराचा अनेकांना अपरिचित असलेला इतिहास उजेडात येऊ शकतो. या वारशाचे दस्तऐवजीकरण करून तो पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही काळाची गरज आहे. निसर्गसंपन्न वसईची ओळख आज वेगाने बदलत असताना तिच्या ऐतिहासिक मुळांचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. आगाशी-सोपारा बंदरांचा इतिहास हा केवळ काही जुन्या बंदरांचा इतिहास नसून वसईच्या आर्थिक समृद्धीचा, व्यापारी दळणवळणाचा आणि बदलत्या भूगोलाचा इतिहास आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या बंदरांच्या पाऊलखुणा शोधून त्यांना पुन्हा इतिहासाच्या नकाशावर स्थान मिळवून देणे आवश्यक आहे.

पेशवेकालीन घराण्यांनी घडविला आगाशीचा इतिहास

पेशवाईच्या काळात गद्रे, फडके, कर्वे, कर्पे, बर्वे, शेंडे, दांडेकर आणि मराठे अशा विविध आडनावांची घराणी आगाशी परिसरात स्थायिक झाली. या घराण्यांनी येथील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनात आपापले योगदान दिले. त्यांच्या वास्तू, वाडे, मंदिरे आणि कौटुंबिक ऐतिहासिक नोंदी या आजही संशोधनाचा महत्त्वाचा विषय ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.