

वाडा : ठाणे व पालघर जिल्ह्यातील लाखों भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वज्रेश्वरी देवीच्या पालखी उत्सवाला प्रारंभ झाला असून आजपासून तीन दिवस हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. आगरी, कोळी, भंडारी यासह अनेक लोकांची कुलस्वामिनी असणाऱ्या या जागृत देवस्थानाला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. इगतपुरी तालुक्यातून या उत्सवाच्या भेटीला जवळपास 200 बैलगाड्या सजवून येतात हे खास वैशिष्ट्य आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात तानसा नदीच्या तीरावर वज्रेश्वरी देवीचे मंदिर पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. पेशवेकालीन चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांवरील विजयानंतर 1739 मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला. चैत्र अमावस्येचा हा दिवस असावा असे जाणकार सांगत असून या दिवसांपासून पुढील तीन दिवस वज्रेश्वरी देवीची भव्य यात्रा भरते. याच मंदिरात परशुरामाची देखील मूर्ती असल्याने या दरम्यान परशुराम जयंती उत्सव साजरा केला जातो.
भंडारी, आगरी, कोळी व पानमाळी अशा विविध समाजाची वज्रेश्वरी ही कुलस्वामिनी असल्याने ठाणे, भिवंडी, सफाळे, पालघर, वसई या भागातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी होतात. गुरुवारी देवीची महापूजा, शुक्रवारी अमावस्येला याठिकाणी चिमाजी अप्पा यांच्या विजयानंतर उभारलेल्या विजयी स्तंभावर दिवा लावून त्याचे पूजन केले जाते व याच दिवशी विविध नवस फेडण्याची प्रथा आहे.
पूर्वीच्या काळी विजेची व्यवस्था नसल्याने दीपमाळेवर लावलेल्या दिव्याचा प्रकाश थेट गाभाऱ्यातील मूर्तीवर पडायचा असे जुने भक्त सांगतात. नाशिक जिल्ह्यातून जवळपास 200 सजविलेल्या बैलगाड्या या उत्सवासाठी दरवर्षी येत असून यंदाही या गाड्यांचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले आहे.
देवीच्या भेटीची आतुरता वर्षभर लागलेली असून पुरातन परंपरा आजही आम्ही जपतो असे नांदगाव सदो ( इगतपुरी ) गावचे गजानन भागडे यांनी सांगितले. जागृत असणारे हे श्रद्धास्थान यात्रेच्या निमित्ताने न्हाऊन निघत असून लाखों भक्त दरवर्षी या उत्सवात सहभागी होतात असे माजी मुख्य पुरोहित हेमंत लेले यांनी सांगितले.