

धारूर ः तालुक्यातील जगदंबा देवी यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदा ही मोठ्या उत्साहात साजरी होत असून शनिवार 2 एप्रिल रोजी पार पडणाऱ्या पालखी मिरवणुकीकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी यंदाच्या यात्रेसाठी विशेष नियोजन केले असून पारंपरिक उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
धारूर तालुक्यापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनिमोहा गावालगत बालाघाटाच्या डोंगरावर जगदंबा देवीचे प्राचीन मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराची ख्याती असून नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. नवरात्र उत्सवानंतर तसेच चैत्र पौर्णिमेला देवीची यात्रा भरते, ही या भागातील एक महत्त्वाची धार्मिक परंपरा मानली जाते.
गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरमाथ्यावर मंदिर असल्याने पालखी मिरवणूक ही यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरते. गावातून मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मिरवणुकीस तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. या यात्रेनिमित्त हजारो भाविक सोनिमोहा येथे दाखल होतात. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने, मिठाई, खेळणी तसेच विविध वस्तूंची विक्री करणारे स्टॉल उभारले जातात.
यात्रेच्या दिवशी भाविक दिवसभर मंदिर परिसरात थांबून पूजा-अर्चा करतात. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे या यात्रेला ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण असून पालखी मिरवणूक आणि कार्यक्रमांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सोनिमोहा येथे पुरातन असे जगदंबा देवीचे मंदिर होते परंतु मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून 40 लक्ष रुपयांचे जगदंबा देवी मंदिर व लगतच येडेश्वरी देवीचे मंदिर बांधकाम करण्यात आले आहे. 55 फूट उंचीचे जगदंबा देवी मंदिर असून मंदिराच्या गाभाऱ्यासह शिखराचे आकर्षक स्वरूप आहे. या परिसरात दोन सभामंडप बांधण्यात आले असून फरशी व अन्य कामे सुरू आहे अशी माहिती श्रीमंत तोंडे यांनी दिली.