Vadhavan Port Protest : वाढवण बंदर विरोधी आंदोलन पेटले; ट्रक अडवले, आंदोलकांची धरपकड

टीघरेपाडा येथे पोलीस-आंदोलकांमध्‍ये धक्काबुक्की; २० ते २५ जण ताब्यात
Vadhavan Port Protest
Vadhavan Port Protestpudhari photo
Published on: 
Updated on: 

डहाणू : वाढवण बंदराच्या उभारणी विरोधातील आंदोलनाने बुधवारी पुन्हा आक्रमक वळण घेतले आहे. बंदराच्या भरावासाठी माती आणि दगडांची वाहतूक करणारे ट्रक टीघरे पाडा परिसरात स्थानिक महिला आणि आंदोलकांनी रोखून धरले.

शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलक हटण्यास तयार नसल्याने पोलिसांनी धरपकड सुरू केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी मनसेचे धीरज गावड, प्रशांत पाटील, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे विनीत पाटील, काँग्रेसच्या डहाणू तालुकाध्यक्ष वर्षा वायडा, माकपचे सुरेश जाधव यांच्यासह २० ते २५ आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना बोईसर येथील डिटेक्शन सेंटरमध्ये नेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Vadhavan Port Protest
Thane Water Dispute : मिरा-भाईंदर शहराच्या हक्काचे पाणी ठाण्याला वळविण्याचे षड् यंत्र

वाढवण बंदर प्रकल्पाला सुरुवाती पासूनच स्थानिक भूमिपुत्र, मच्छीमार आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. प्रकल्पामुळे स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत विविध संघटना आणि ग्रामस्थ सातत्याने आंदोलन करत आहेत. असे असतानाही बंदराच्या प्राथमिक कामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

बंदरासाठी भराव टाकण्याकरिता मोठ्या प्रमाणावर माती आणि दगडांची वाहतूक अवजड ट्रकच्या माध्यमातून सुरू होती. ही वाहतूक सुरू असल्याचे समजताच बुधवारी महिला आणि शेकडो आंदोलक टीघरे पाडा परिसरात एकत्र आले. त्यांनी ट्रक अडवून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर असताना आणि नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही बंदराचे काम पुढे रेटले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. माती आणि दगडांची वाहतूक कायमस्वरूपी बंद झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक रस्त्यावर बसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.

Vadhavan Port Protest
Cipla Company DRI Raid : ‘सिप्ला’च्या विक्रोळी कार्यालयासह भिवंडीतील गोदामाची झाडाझडती

घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागण्यांवर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांना हटविण्यासाठी धरपकड सुरू केली. या कारवाईला आंदोलकांनी विरोध केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली आणि पोलिसांच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या कारवाईत २० ते २५ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि बंदर विरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्यांना बोईसर येथील डिटेक्शन सेंटरमध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेतल्याने संतप्त ग्रामस्थ आणि कार्यकर्ते वरोर नाका येथे जमले व त्यांनी राज्यमार्ग रोखून रास्ता रोको केला.

कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

परिस्थिती चिघळू नये आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी आंदोलकांना शांत केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली. टीघरे पाडा येथे ट्रक रोखणे, पोलिसांची धरपकड आणि त्यानंतर वरोर नाक्यावर झालेला रास्ता रोको, अशा घटनांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. बंदर विरोधी आंदोलन पुन्हा तीव्र झाल्याने प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.