

खोडाळा : मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत कारेगाव शिवाराच्या बाजूने वैतरणा नदीपात्रात अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मिळून आले आहे.मोखाडा पोलिसांनी सदर व्यक्तीचे शव शवविच्छेदन करण्यासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अनोळखी पुरुषाचे वर्णन, वय अंदाजे 30 ते 40 वर्षे, उजव्या हातात धातूचे कडे असून दोन्ही हातावर गोंदण आहे. सदर व्यक्ती कुणाच्या ओळखीची असल्यास तात्काळ सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मोखाडा पोलिसांनी केले आहे.
पोलिस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे 97301 26947 पोलिस अंमलदार 8830824469 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे करत आहेत.
मोखाडा तालुक्यातील मध्य वैतरणा प्रकल्पाकडे जिल्हा बाहेरील पर्यटक नेहमीच आकृष्ट होतात. या परिसरात असलेला अशोका धबधबा सर्वदूर परिचित आहे. त्यामूळे ओघानेच वैतरणा प्रकल्प आणि येथील निसर्गसौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करते. पर्यायानेच बहूदा निर्मणूष्य असलेला मध्य वैतरणा परिसर आणि अत्यंत खोल असलेला मध्य वैतरणा प्रकल्प हा छुप्या गुन्हेगारीचे आश्रयस्थान झालेला आहे. या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती कडून वर्षाकाठी २/३ प्रेतांची विल्हेवाट लावण्यात येते. तसेच सावर्डे आदी परिसरांतून मध्य वैतरणाच्या विसर्गात अनेक आदिवासी बांधवांचा वाहून जाऊन आकस्मिक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.मागील वर्षी अशाच प्रकारे सावर्डे येथील १ आदिवासी बांधव वाहून गेला होता.
जीवावर उदार होऊन काढले होते पर्यटकाचे प्रेत
मध्य वैतरणा प्रकल्पाकडे वर्षा फेरीचा आनंद लुटीत फिरण्यासाठी आलेल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड परिसरातील आनंद पोपट गिते यांचा प्रकल्पात पोहोत असतांना सेल्फी घेत असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे तोल गेला यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी कारेगाव ग्रामस्थ आणि खोडाळा पोलिस दुरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी यांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन गिते यांचे शव बाहेर काढले होते. यावेळी कायमस्वरूपी जीवरक्षक दलाची मागणीही स्थानीक ग्रामपंचायतीने नोंदवली होती.मात्र त्यावर सकारात्मक विचार झाला नाही.परंतू अत्यंत संवेदनाक्षम आणि बहूचर्चित व गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी आंदन ठरलेल्या मध्य वैतरणा प्रकल्पाचा विचार रोबोटिक बोटीसाठी करणे अत्यावश्यक आहे.त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाणिवपूर्वक विचार करण्याची गरज आहे.