खोडाळा : आपात्कालीन स्थितीत तसेच समुद्र, नदी, नाले अशा ठिकाणी बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत १ कोटी ६६ लाख रुपये खर्च करून मानवरहित अर्थात रोबोटिक बोटी देण्यांत आल्या आहेत. या बोटी पालघर जिल्ह्यातील सागरी पोलीस ठाण्यासह नगरपरिषद व नगरपंचायत यांना वाटप करण्यात आल्या आहेत. बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी या रोबोटिक बोटी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्या तरी अतिशय संवेदनाक्षम व सोयी सुविधांचा अभाव आणि विशेषतः पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या मध्य वैतरणा प्रकल्पाचा मात्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला विसर पडला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत या रोबोटिक बोटीचे वाटप करण्यात आले असून त्या कशा कार्यान्वित कराव्यात यासाठी समुद्रकिनारी व इतर ठिकाणी त्याचे प्रशिक्षण पोलिसांसह संबंधित आस्थापनातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बळकटी करणाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जिल्ह्यातील केळवे, सातपाटी, वाणगाव, डहाणू, घोलवड, तारापूर अशा सहा सागरी पोलीस स्टेशनना, डहाणू, जव्हार, वाडा व पालघर या ३ नगरपालिकांना रोबोटिक बोटींचे वाटप करण्यात आले आहे. मात्र जेथे अत्यंत गरज आहे अशा मोखाडा तालुक्यातील मध्य वैतरणा प्रकल्पाचा यामध्ये कोणत्याही स्तरावरुन विचार करण्यात आलेला नाही,
मोखाडा तालुक्यातील मध्य वैतरणा प्रकल्पाकडे जिल्हा बाहेरील पर्यटक नेहमीच आकृष्ट होतात. या परिसरात असलेला अशोका धबधबा सर्वदूर परिचित आहे. त्यामुळे ओघानेच वैतरणा प्रकल्प आणि येथील निसर्गसौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करते. पर्यायानेच बहुदा निर्मणूष्य असलेला मध्य वैतरणा परिसर आणि अत्यंत खोल असलेला मध्य वैतरणा प्रकल्प हा छुप्या गुन्हेगारीचे आश्रयस्थान झालेला आहे. या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती कडून वर्षाकाठी २/३ प्रेतांची विल्हेवाट लावण्यात येते. तसेच सावर्डे आदि परिसरांतून मध्य वैतरणाच्या विसर्गात अनेक आदिवासी बांधवांचा वाहून जाऊन आकस्मिक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
मागील वर्षी अशाच प्रकारे सावर्डे येथील १ आदिवासी बांधव वाहून गेला होता. मध्य वैतरणा प्रकल्पाकडे वर्षा फेरीचा आनंद लुटीत फिरण्यासाठी आलेल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड परिसरातील आनंद पोपट गिते यांचा प्रकल्पात पोहोत असतांना सेल्फी घेत असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे तोल गेला यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी कारेगाव ग्रामस्थ आणि खोडाळा पोलिस दुरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी यांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन गिते यांचे शव बाहेर काढले होते.
यावेळी कायमस्वरूपी जीवरक्षक दलाची मागणीही स्थानीक ग्रामपंचायतीने नोंदवली होती. मात्र त्यावर सकारात्मक विचार झाला नाही. परंतु अत्यंत संवेदनाक्षम आणि बहुचर्चित व गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी आंदन ठरलेल्या मध्य वैतरणा प्रकल्पाचा विचार रोबोटिक बोटीसाठी करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाणिवपूर्वक विचार करण्याची गरज आहे.