पालघर : पालघर शहरातील लोकांनी ऑनलाईन वरून मागवलेले महागाडे फोन इंस्टाकार्टच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली होती. नाना नानी पार्क येथील ऑफिसची खिडकी फोडून चोरी करण्यात आली होती.
याबाबत पालघर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर चोरी उघड करण्यात पालघर पोलिसांना यश आले. यात कार्यालयात काम करणारा कर्मचारी सापडल्याने शहरांत खळबळ माजली आहे.
दि. २८/०९/२०२४ रोजी पहाटे ०३.१५ वा. ते ०३.२५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी श्री. संजय राजाराम यादव, यांचे पालघर (पश्चिम) येथील नाना नानी पार्क माधवम इमारतीचे तळमजल्यावरील इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमीटेड या ऑफिसची स्लायडींगची खिडकी कोणीतरी अनोळखी चोरट्याने उचकटून, त्यावाटे कार्यालयात प्रवेश करुन, कार्यालयात ठेवलेले एकूण ५,१३,९३७/- रुपयाचे वेगवेगळ्या कंपनीचे २० मोबाईल हॅण्डसेट, १८०२/- रुपये किंमतीचे पॉवर बँक, २९६/- रुपयाचे वाईल्ड स्टोन परफ्युम असा एकुण ५,१६,०३५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांचे संमती शिवाय चोरी करुन चोरून नेला म्हणून फिर्याद दिली होती.
फिर्यादीवरून पालघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पालघर पोलीस ठाण्यातील पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास पथक तयार करून सदर पोलीस पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून, गुन्ह्याची माहिती घेऊन, तांत्रीक स्वरुपाचे मदतीने सदरचा गुन्हा तपास सुरू केला असता त्यात काम करणारा आकाश जितेंद्र ठाकुर, वय २६ वर्षे, रा. हनुमान मंदिराजवळ, बिरवाडी ता.जि. पालघर यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीकडून सदर गुन्ह्यात चोरलेले ५,१६,०३५/- रु. किमंतीचे २० मोबाईल हॅण्डसेट, पॉवर बँक, परफ्प्युम असा सर्व मुद्देमाल जमीनीत गाडुन ठेवल्याचे सांगितले. नमूद ठिकाणाहून गुन्हयात गेलेला मुद्देमाल जप्त करुन आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.