

वाडा : एकवेळ जेवायला नसले तरी चालेल पण विजेशिवाय जगणे अवघड आहे अशी अवस्था हल्ली माणसाची झाली आहे. ग्रामीण भागात मात्र विजेची स्थिती दयनीय असून विजेची चोरी करणारे खुशीत तर विद्युत मीटरधारक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. महावितरण विभागाने याबाबत कठोर भूमिका घेणे गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर मधून निघणारी वीज मुख्यत्वे तीन प्रमुख वाहिण्यांमधून गावात पसर- लेली असून वेगवेगळया विभागात तीचे वितरण केलेले असते. ग्रामीण भागातील उपकरणे जुनाट झाल्याने किंवा अनेकदा चोरून चुकीच्या पद्धतीने वीज वापरल्याने ग्रामीण भागात विजेच्या लपंडावाने जनता बेजार झाली आहे. उपकरणांवर जादा भार येऊन विजेचा लपंडाव सुरू असतो. अधिकृत मीटरधारक वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट बघतो परंतू चोरटा या ना त्या वाहिन्यांवर आकडे टाकून आपली गरज भागवत असतो.
गावागावात लहानमोठी कामे गावातील काही समाजसेवक करीत असतात मात्र अनेकदा मोठ्या बिघडाच्या वेळी ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागते. वीज नसल्याने प्रथमतः झोपेचे खोबरे होते ज्यामुळे अनेकदा नोकरदार व शाळकरी विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागतो, भरमसाट वीजबिल भरुन एकीकडे कंबरडे मोडत असताना दुसरीकडे विजेच्या समस्यांना सामोरे जाणे अनेकांना अन्यायकारक वाटते. महावितरण विभागाने चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करुन गावाअंतर्गत विद्युत व्यवस्था अधिक बळकट करावी अशी मागणी केली जात आहे.
महावितरण अधिकारी अनेकदा चोरीच्या घटना रोखण्यासाठी धडक कारवाई करतात, ज्यात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. महावितरण कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याची खबर मात्र अनेकदा खुद्द कर्मचारीच गावात देतात असा आरोप असून अपुरा कर्मचारी वर्ग ग्राहक व महावितरण यातील दरी वाढवत आहे. वीज मिळविण्यासाठी केलेली धडपड अनेकदा अधिकृत ग्राहकांच्या अंगास येते मात्र आकडे टाकून वर्षानुवर्ष चोरी करणारा कधीही कारवाईच्या कक्षेत येत नाही हे दुर्दैवी आहे.