

बोईसर: तारापूर एमआयडीसीतील वाढते औद्योगिक प्रदूषण, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेला परिणाम तसेच मच्छीमारांच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या उपजीविकेचा प्रश्न शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे जोरदारपणे उपस्थित करण्यात आला.
शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांनी या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषणाच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.
चर्चेदरम्यान आमदार गावित यांनी तारापूर एमआयडीसीत १३०० हून अधिक उद्योग कार्यरत असून त्यापैकी सुमारे ८०० उद्योग अतिसंवेदनशील असल्याचे सांगितले.
प्रदूषणामुळे परिसरातील हवा, पाणी आणि जमिनीची गुणवत्ता गंभीरपणे खालावली असून, रासायनिक सांडपाण्यामुळे मुरबे, नवापूर आणि दांडी परिसरातील खाड्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. यामुळे पापलेटसह विविध माशांच्या प्रजननावर परिणाम होऊन हजारो मच्छीमारांच्या रोजगारावर संकट ओढवल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
रात्रीच्या वेळी विषारी वायू सोडला जात असल्याने नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार आणि गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत अनेक उद्योगांकडून बोअरवेलच्या माध्यमातून भूगर्भात रासायनिक पाणी सोडले जात असल्याने शेतीही धोक्यात आल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर बोईसरसाठी नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वर्षभर वाहणाऱ्या प्रदूषित नाल्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना आणि माशांवरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे मान्य केले. रेड आणि ऑरेंज श्रेणीतील उद्योगांची संख्या लक्षात घेता विद्यमान २५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अपुरा पडत असल्याचे सांगून नवीन प्रकल्प उभारणीसंदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाईचे निर्देश
प्रदूषित पाण्याचा मासेमारीवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी संबंधित मत्स्य संस्थेमार्फत विशेष सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच केवळ हवेचेच नव्हे, तर पाण्याच्या गुणवत्तेचेही सातत्याने निरीक्षण करण्यासाठी 'कंटिन्युअस मॉनिटरिंग' प्रणाली कार्यान्वित केली जाईल.
भूगर्भात रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेत तारापूर एमआयडीसीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने औद्योगिक प्रदूषणाबाबत शासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्यासह तारापूर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांची मनमानी वाढल्याची चर्चा
तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेत गाजत असताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अद्याप तारापूर एमआयडीसीला प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर प्रभावी नियंत्रण राहिले नसल्याची भावना नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांमध्ये व्यक्त होत आहे.
औद्योगिक प्रदूषण, दूषित हवा, रासायनिक सांडपाणी आणि पर्यावरणीय नियमांचे कथित उल्लंघन अशा गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत असतानाही वरिष्ठ स्तरावरील प्रत्यक्ष पाहणी न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांची मनमानी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते न थांबता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तारापूर एमआयडीसीला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.