

बोईसर : पावसाळ्याच्या प्रारंभीच तारापूर एमआयडीसी परिसरात नैसर्गिक नाल्यांमधून रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. पावसाच्या पाण्याचा आधार घेत काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाण्याचा विसर्ग केला जात असल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तारापूर एमआयडीसीमध्ये सुमारे ५०० हून अधिक रासायनिक उद्योग कार्यरत आहेत. या परिसरातील प्रदूषणाबाबत वेळोवेळी तक्रारी होत असून, अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीतील बोअरवेलमधून पिवळसर व निळसर रंगाचे पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दूषित पाण्यामुळे विविध गंभीर आजार, तसेच कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोलापूर एमआयडीसीतील सांडपाणी प्रश्नावर शासन स्तरावर लक्ष वेधले जात असताना, तारापूर एमआयडीसीतील गंभीर प्रदूषणाच्या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही अद्याप तारापूर एमआयडीसीला भेट न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पहिल्याच पावसानंतर नैसर्गिक नाल्यांमधून रासायनिक पाणी वाहत असल्याचे प्रकार समोर आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही कारखानदारांचे कर्मचारी कारखानदारांच्या हितासाठी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने वस्तुस्थितीची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक नाले आणि परिसरातील जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.