

कासा ः राज्यातील ग्राम महसूल यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन महसूल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळविण्यात येते की, राज्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या वापरातील लॅपटॉप, प्रिंटर व स्कॅनर ही साधने पूर्णतः जीर्ण व निकामी झाल्याने कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर नवीन, उच्चक्षमतेची साधने उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार शासनाकडे करण्यात आली. मात्र, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील तलाठी व मंडळाधिकारी यांनी सोमवारपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्काराचा थेट परिणाम 7/12, 8-अ उतारे वितरण प्रणाली, ई-पिक पाहणी नोंदणी, ई-फेरफार प्रक्रिया, ऑनलाईन वाहन तपासणी तसेच शेतकरी ओळखपत्र मंजुरीसह विविध महत्त्वाच्या ऑनलाईन महसूल सेवांवर होणार आहे. परिणामी, शेतकरी व नागरिकांना मोठ्या असुविधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली असून, हा बहिष्कार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, न्याय्य मागण्या मान्य करून तातडीने नवीन संगणकीय साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा हा आंदोलनात्मक पवित्रा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. दरम्यान, महसूल प्रशासनाशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.