Talasari Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचे तांडव; उड्डाणपूल मंजूर करा, नाहीतर हायवे जाम करण्याचा इशारा

एका आठवड्यात चार अपघात आणि दोन मृत्यू झाल्याचा दावा; हायमास्ट दिवे व गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी
Talasari Highway
Talasari HighwayPudhari
Published on: 
Updated on: 

तलासरी: मुंबई-आहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील मौजे वडवली येथील निलगिरी हॉटेलसमोरील कट सध्या स्थानिक नागरिकांसाठी आणि वाहनचालकांसाठी थेट यमराजाचे द्वार बनला आहे.

अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, मागील अवघ्या एका आठवड्यात या ठिकाणी चार भीषण अपघात झाले असून, दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर चौघेजण गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

वारंवार होणाऱ्या या मृत्यूच्या तांडवानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मात्र कुंभकर्णी झोपेत असून, प्रशासनाच्या या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

वडवली ग्रामपंचायत आणि तलासरी पोलीस प्रशासनाने या जीवघेण्या भागाची गंभीरता ओळखून येथे ओव्हर ब्रीज (उड्डाणपूल) किंवा भुयारी मार्ग (अंडरपास) तयार करण्यासाठी एनएचएआय कडे वारंवार लेखी पत्रव्यवहार केला आहे.

Talasari Highway
Mumbai water planning: मुंबई-ठाण्याची पाण्याची चिंता मिटणार? २०५१ पर्यंतचे नियोजन करण्यासाठी सरकारचा निर्णय

मात्र, प्रत्येक वेळी या पत्रांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे तकलादू कारण पुढे करून अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. नुकताच २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास निलगिरी हॉटेलसमोर एक अत्यंत भीषण अपघात घडला.

रस्ता ओलांडताना दुचाकीचा वेग कमी झाल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात किसन चैत्या खानझोडे (३६) या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. तलासरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला, तरी मूळ समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे अजूनही लक्ष गेलेले नाही.

Talasari Highway
Fishermen Diesel Subsidy: महाराष्ट्रातील मच्छिमारांचा खर्च वाढला; स्वस्त डिझेल आणि वीजदरांसाठी मागणी

या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती अपघातांना निमंत्रण देणारी आहे. महामार्गाचा हा भाग सरळ आणि तीव्र उताराचा असल्याने वाहने अतिवेगात असतात. त्यातच या संवेदनशील वळणावर ना कोणती सिग्नल यंत्रणा आहे, ना हायमास्ट लाईट्स. रात्रीच्या वेळी तर येथे संपूर्ण काळोख असतो, ज्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही.

स्थानिक कस्तुरबा गांधी विद्यालय, ज्ञानदीप हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज आणि वडवली, सवणे, वंकास या गावांतील हजारो नागरिक, लहान मुले व महिलांना जीव मुठीत धरून हा हायवे ओलांडवा लागतो. सर्व्हिस रोड नसल्यामुळे अनेक वाहने विरुद्ध दिशेने (रॉन्ग साईड) येतात. ज्यामुळे अपघातांची तीव्रता अधिक वाढते.

आता स्थानिक ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. एकाच आठवड्यात चार अपघात आणि दोन मृत्यू ही बाब अतिशय गंभीर आहे. जर पुढील आठवड्याभरात एनएचएआय ने येथे उड्डाणपुलाचे काम मंजूर केले नाही आणि तात्पुरत्या उपाययोजना म्हणून हायमास्ट लाईट्स व गतिरोधक बसवले नाहीत. तर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा वडवली ग्रामस्थांनी दिला आहे. दिरंगाईमुळे आणखी किती निष्पापांचे बळी जाणार, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

हा कट अत्यंत धोकादायक असून एका हॉटेलसमोरील हा कट म्हणजे प्रशासनाने तयार केलेला मृत्यूचा सापळा आहे. आम्ही ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उड्डाणपुलासाठी (एनएचएआय) वारंवार विनंत्या केल्या, पत्रव्यवहार केले, पण अधिकाऱ्यांच्या ढिम्म प्रशासनाला पाझर फुटलेला नाही. एकाच आठवड्यात चार अपघात होऊन आमच्या दोन निष्पाप बांधवांचा जीव गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर या अधिकाऱ्यांना जाग येणार आहे? जर प्रशासनाने आता तात्काळ उड्डाणपुलाचे काम मंजूर केले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी (एनएचएआय) जबाबदार असेल.

- अंदकुमार हाडळ, माजी उपसभापती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news