

सुरेश वळवी
तलासरी: लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांच्या बंडलवर पुढे-मागे खऱ्या नोटा लावून, ते बंडल खऱ्या नोटांचेच असल्याचे भासवून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक (ठगवणूक) करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.
तलासरी गावच्या हद्दीतील लिलाराम हॉटेलजवळ डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एक कार, बनावट नोटांचे बंडल आणि अन्य मुद्देमालासह एकूण ५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रणित कैलास पवार ३९ वर्षे, व्यवसाय- मजुरी, राहणार विठेवाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तलासरी येथील लिलाराम हॉटेलच्या परिसरात सापळा रचला होता.
यावेळी संशयास्पद रित्या आलेल्या पांढऱ्या रंगाच्या सुझुकी स्विफ्ट डिझायर कारला पोलिसांनी थांबवून तिची झडती घेतली. कारची तपासणी केली असता पोलिसांना त्यामध्ये एक ब्राऊन रंगाची 'नाईक' कंपनीची बॅग आढळून आली.
या बॅगची झडती घेतली असता, पोलिसांना त्यामध्ये ५०० रुपयांच्या हिरवट रंगाच्या नोटांचे सुमारे १५ लाख रुपये दर्शनी मूल्य असलेले ३ मोठे बंडल मिळून आले. मात्र, पोलिसांनी या बंडलांची बारकाईने पाहणी केली असता फसवणुकीचा एक मोठा प्रकार समोर आला.
या बंडलमधील मधल्या सर्व नोटांवर 'भारतीय बच्चों का बँक' असे मराठीत लिहिलेले असून त्यावर 'पाच सौ नंबर' आणि सिरीयल क्र. IBB 000000 असा होता. तसेच मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र होते. समोरील व्यक्तीला फसवण्यासाठी आरोपीने या प्रत्येक बंडलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला ५०० रुपयांची खरी नोट लावली होती, जेणेकरून पूर्ण बंडल खऱ्या नोटांचेच वाटावे. हा आरोपी या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून एखाद्या व्यक्तीची मोठी ठगवणूक करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
लाखाेंचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार, ३ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा, खऱ्या नोटा आणि २०० रुपयांची नाईक कंपनीची बॅग असा एकूण ५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात फसवणूक आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे आणखी कोणाचे रॅकेट आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.