

कासा: डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी मार्गावरील कुरेशी दरबार परिसरात सोमवारी रात्री अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना व दुचाकींना जोरदार धडक दिल्याने मोठी खळबळ उडाली.
या घटनेत संदेश तुकाराम कवले आणि मयुर सुरेश कांबेरा हे जखमी झाले असून, अन्य काही नागरिकही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर कारचालक पसार झाला, तर कारमधील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या मित्रांसह कासा येथील कुरेशी दरबार परिसरात रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्यावेळी चारोटीकडून कासा दिशेने भरधाव वेगाने येणारी कार त्यांच्या दिशेने आली.
या कारचा चालक आणि त्याच्यासोबत असलेला अक्षय शिरसाट यांनी संगनमत करून वाहनाचा वापर करत फिर्यादी व त्यांचा मित्र यांना जोरदार धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी समोर उभी असलेली दुचाकीही कारच्या धडकेत नुकसानग्रस्त झाली. घटनास्थळी उपस्थित अन्य मित्रांनी कार थांबविण्याचा प्रयत्न करत आरडाओरडा केला. मात्र, आरोपींनी त्यांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सुदैवाने ते बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर कारचालक भरधाव वेगाने कासा दिशेने पळून गेला. मात्र, दिपू गॅरेजसमोर वाहन रस्त्याखाली गेल्याने कारचा पुढील टायर वाकला. त्यानंतर चालक बिलाल घटनास्थळावरून पसार झाला, तर कारमधील अक्षय शिरसाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध मद्याचा साठा आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या या कारचा पोलिसांकडून पाठलाग सुरू होता. पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी चालकाने वाहनाचा वेग वाढवला.
कासा-चारोटी मार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी कासा पोलीस ठाण्यात गर्दी करून पोलिसांच्या पाठलागाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रहदारीच्या रस्त्यावर अशा प्रकारे वाहनांचा पाठलाग केल्यामुळेच निष्पाप नागरिकांना जीव धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात कारचालक बिलाल व कारमधील अक्षय मोहन शिरसाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.