

पालघर : आमदार म्हणून मतदारांमध्ये प्रतिबिंब उमटवण्याऐवजी नाचकाम करणारा आमदार आम्हाला नको. आमदार म्हणून काम करण्याऐवजी इतर कामे करणाऱ्या आमदाराचा काय फायदा? असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी श्रीनिवास वनगा यांना लगावला.
शिवसेनेशी निष्ठावान असलेले विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापल्यानंतर आपला घात केला. या त्यांच्या भावनिक आरोपानंतर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात रात्री पत्रकार परिषद घेऊन कुंदन संखे यांनी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या कार्यकाळातील उणीवांवर आरोप प्रत्यारोप केले.
आमदारांचा मतदारांशी जनसंपर्क असायला हवा. मात्र गेल्या पाच वर्षात आमदार श्रीनिवास वनगा यांचा जनसंपर्क निष्क्रिय होता. मतदारांशी जनसंपर्क नसलेला आमदार अशी त्यांची ओळख ठरली होती. त्यामुळे त्यांच्या या सर्व गोष्टींचे मूल्यांकन केल्यानंतरच पक्षामार्फत त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली, असे कुंदन संखे यांनी सांगितले.
श्रीनिवास यांचा तोकडा जनसंपर्क व मतदारांना द्यावे लागणारे तोंड अशी जनभावना लक्षात घेता पालघरची उमेदवारी बदलावी लागेल, यासाठी मुख्यमंत्री यांना आम्ही सर्वांनी सांगितल्याचे जिल्हाप्रमुख संखे यांनी सांगितले. पदाधिकारी यांचा आग्रह व जनभावना यांच्या मागणीचा आदर राखत मुख्यमंत्र्यांनी पालघरची उमेदवारी बदलल्याचे यांनी सांगितले. शिवसेनेमार्फत तिकीट मिळालेले उमेदवार राजेंद्र गावित हे दांडगा जनसंपर्क व जिल्ह्यात चांगले काम केलेले व्यक्तिमत्व असल्याने त्यांना दिलेल्या उमेदवारीवर आम्हाला विश्वास असल्याचे संखे म्हणाले.
आमदार श्रीनिवास वनगा यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेप्रमाणे पाच वर्षे आधी अशीच भावनिक प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. घात केला असे आरोप ते करत असले तरी घात हा श्रीनिवास वनगा यांचा नसून त्यांच्यामुळे पालघर विधानसभेतील मतदारांचा घात झाला आहे. त्यामुळे घेतलेली पत्रकार परिषद चुकीची व त्यातील आरोप बिनबुडाचे होते, असेही संखे यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालघर विधानसभा निरीक्षक पांडुरंग पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.