शिर्डी हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिले आमदार राहिलेले स्व. चंद्रभान घोगरे यांच्या सूनबाई प्रभावती या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात यंदा विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. 1990 मध्ये प्रभावती यांचा भाऊ एकनाथ घोगरे यांनी शिर्डीतून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर घोगरे कुटुंबीय विधानसभेच्या मैदानात कधी दिसलेच नाही. आता तब्बल 35 वर्षांनंतर ते मैदानात उतरले, तेही थेट विखे पाटील या बड्या प्रस्थाशी सामना करण्यासाठी.
अर्थात त्यांच्यामागे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा ‘हात’ आहेच. वाकडी, चितळी या मोठ्या ग्रामपंचायती हातून गेल्यानंतर गणेश कारखान्याची सत्ताही विखेंच्या हातून निसटली. ही राजकीय उलथापालथ पाहता यंदाची विधानसभा निवडणूक विखे पाटील यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, असेच चित्र सध्या तरी दिसते आहे!
1978 मध्ये शिर्डी स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाल्यानंतर तेथून पहिले आमदार होण्याचा मान (स्व.) चंद्रभान भाऊसाहेब घोगरे यांना मिळाला होता. त्या वेळी त्यांनी अण्णासाहेब म्हस्के यांचा पराभव केला होता. म्हस्के त्या वेळी जिल्हा परिषदेत सभापती असताना जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.
पुढच्या म्हणजे 1980च्या विधानसभेला घोगरे यांनी उमेदवरी केली नाही. म्हस्के यांना या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कडून उमेदवारी मिळाली. गणेश सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष भास्कर रामकृष्ण जाधव हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू) कडून म्हस्के यांचे प्रतिस्पर्धी होते. भाजपकडून सूर्यभान रघुनाथ वहाडणे हेही उमेदवारी करत होते. त्यात सुमारे 34 हजार मतांनी विजयी झाले होते. 1985 मध्ये समाजवादी काँग्रेसचे रावसाहेब नाथाजी म्हस्के यांचा पराभव करत अण्णासाहेब म्हस्के पुन्हा काँग्रेसकडून आमदार झाले.
1990 मध्ये माजी आमदार (स्व.) चंद्रभान घोगरे यांचे चिरंजीव एकनाथ घोगरे यांनी अण्णासाहेब म्हस्के यांच्या विरोधात निवडणूक लढविली. म्हस्के काँग्रेसचे, तर घोगरे जनता दलाचे उमेदवार होते. सुहास वसंतराव वहाडणे हेही शिवसेनेकडून मैदानात उतरले होते. त्या वेळी सोळा हजार मतांनी म्हस्के विजयी झाले अन् त्यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक केली. तेव्हापासून घोगरे कुटुंबीय विधानसभा निवडणुकीपासून दूर झाले, ते आजतागायत.
1995मध्ये काँग्रेसने अण्णासाहेब म्हस्के यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी दिली. शिवसेनेचे धनंजय गाडेकर हे विखेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. या निवडणुकीत तीस हजार मतांनी विजय मिळवत राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदा शिर्डीचे आमदार झाले. तेव्हापासून आजतागायत ते शिर्डीतून सलग विजयी होत आले आहेत.
2019 नंतर यंदा म्हणजे 2024 च्या निवडणुकीत विखे पाटील पुन्हा भाजपकडून शिर्डी विधानसभेची निवडणूक लढवीत असून काँग्रेसने त्यांच्या विरोधात शिर्डीचे पहिले आमदार (स्व.) चंद्रभान घोगरे यांच्या सूनबाई प्रभावती यांना उमेदवारी दिली आहे.
प्रभावती घोगरे या (स्व.) शंकरराव एकनाथराव खर्डे ऊर्फ शंकरनाना यांच्या कन्या. शंकरनाना खर्डे हे कोल्हारचे बडे प्रस्थ होते. त्या काळी गावातील कोणताही तंटा मिटविण्यासाठी लोक त्यांच्याकडे जात. 1978-79च्या दरम्यान शंकरनाना खर्डे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्या वेळी यशवंतराव गडाख पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
शंकरनाना खर्डे तेव्हापासून विखे विरोधक असून आज त्यांच्याच कन्या प्रभावती या विखेंच्या विरोधात विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. 1966 नंतर प्रवरा साखर कारखान्यावर बाळासाहेब विखे पाटील यांचे वर्चस्व आले. कारखान्याच्या निवडणुकीत ते विरोधकांनाही आपलेसे करत. त्यामुळे शंकरनाना खर्डे यांना कारखान्याच्या संचालकपदाची संधी मिळे.
याच शंकरनाना खर्डे यांच्या कन्या प्रभावती यांचा विवाह पुढे माजी आमदार चंद्रभान घोगरे यांचे पुत्र जनार्दन यांच्याशी झाला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळल्यानंतर खर्डे नाना राजकारणापासून दूर झाले. आता त्याच खर्डे कुटुंबातील प्रभावती यांचा सुमारे 35 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीत विखे घराण्याशी सामना होत आहे.
1971 ते 1991 पर्यंत बाळासाहेब विखे पाटील हे शिर्डीचे खासदार होते. या काळात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध प्रस्थापित झाले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी बाळासाहेब विखेंचे घनिष्ठ संबंध होते. जिल्ह्याबाबतचा कोणताही निर्णय बाळासाहेबांशी सल्लामसलत केल्याशिवाय चव्हाण मुख्यमंत्री असूनही घेत नव्हते.
‘बाळासाहेब विखे पाटील हे प्रतिमुख्यमंत्री आहेत’, असे त्या काळी मधुकर पिचड भाषणात जाहीरपणे सांगत. तीन टर्म आमदार राहिलेले अण्णासाहेब म्हस्के हे कृषी व पाटबंधारे राज्यमंत्री होते. त्यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आमदार झाले अन् त्यांनी कृषी, शिक्षण, पाटबंधारे, परिवहन, महसूल यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. आता ते सातव्यांदा शिर्डीतून विधानसभा लढवत आहेत.
प्रभावती घोगरे यांना काँग्रेसने उमेदवारी देत विखे पाटलांविरोधात विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. घोगरे यांचे माहेर याच मतदारसंघातील कोल्हार अन् सासर लोणी खुर्द असल्याने त्या विखे यांना कडवी झुंज देतील, असे बोलले जाते. शिवाय विखेंचे पारंपरिक राजकीय विरोधक माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे पाठबळ घोगरे यांच्या पाठीशी आहेच. गणेश साखर कारखान्याच्या सत्तेतून पायउतार होण्यापूर्वी चितळी, वाकडीसारख्या मोठ्या गावांतील सत्ताही विखे पाटलांच्या ताब्यातून गेल्या आहेत. भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांची विखेविरोधी भूमिका आजही कायम आहे. त्यामुळेच त्यांनी विखे पाटलांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विखे पाटील हे सलगपणे शिर्डीचे आमदार असल्याने या काळात त्यांनी अनेक विकासात्मक कामे उभी केली. खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासोबतच निळवंडेचा पाणी आणि एमआयडीसी उभारणी या विखे पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत. तरीही प्रभावती घोगरे आणि डॉ. पिपाडा यांची उमेदवारी पाहता विखे पाटील यांना ही लढत हलक्यात घेऊन चालणार नाही, असेच चित्र आजमितीला शिर्डी मतदारसंघात दिसते आहे.
असेही नातेगोते...!
घोगरे हे जरी विखे पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी विखे-घोगरे हे नातेही तितकेच निकटचे आहे. (स्व.) बाळासाहेबांची पुतणी म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांची चुलतबहीण ही एकनाथ घोगरे यांची पत्नी आहे. एका अर्थाने घोगरे-विखे हे व्याही व्याही आहेत. शंकरनाना खर्डे यांची कन्या प्रभावती याच घोगरे कुटुंबातील. विखे-घोगरे यांचे नातेगोते असले तरी राजकारणात कोणी कोणाचे नसते हेही खरेच!
1995मध्ये राज्याच्या राजकारणात प्रवेश
अण्णासाहेब म्हस्के हे स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे मावसभाऊ. 1980 ते 1995 पर्यंत ते शिर्डीचे आमदार, तर स्व. विखे पाटील खासदार असायचे. दोघांच्या शब्दाला काँग्रेसमध्ये मान होता. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात म्हस्के मंत्री होते. 1995 मध्ये म्हस्के यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली अन् त्यांचा राज्याच्या राजकारणात प्रवेश झाला. तेव्हापासून ते सलगपणे शिर्डीचे आमदार. त्यांच्या पत्नी शालिनीताई जिल्हा परिषदेच्या दोनदा अध्यक्ष होत्या, तर चिरंजीव डॉ. सुजय 2019मध्ये नगरचे खासदार झाले.