पालघर :अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘शक्ती’ चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून त्याचे रूपांतर ‘तीव्र चक्रीवादळी वादळा’मध्ये झाल्यामुळे 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या काळात जिल्ह्याच्या समुद्रकिनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ भारताच्या किनार्यापासून दूर जात असल्याने भूस्खलनाचा धोका नाही, मात्र किनारी भागांमध्ये सोसाट्याचे वारे आणि समुद्रात रौद्र स्थिती कायम राहील.
शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचे, त्याचप्रमाणे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आहे.
4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वायव्य अरबी समुद्र, त्याला लागून असलेला ईशान्य अरबी समुद्राचा भाग, मध्य अरबी समुद्र आणि गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच समुद्रात जाऊ नये, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पालघर जिल्ह्यात 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवली आहे. 8 ऑक्टोबरला जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे.
चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात, विशेषतः पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ढगांची तीव्र निर्मिती आणि वातावरणात आर्द्रता वाढल्याने उत्तर कोकणातील सखल भागात पूर येण्याची शक्यता आहे.
3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वेगवान वार्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या किनार्यावर 45 ते 55 किमी प्रतितास आणि 65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार वार्याचा वेग वाढू शकतो. तसेच समुद्र अधिक खवळू शकतो.