

वसई : मुंबई महानगर प्रदेशातील नालासोपारा शहराला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी भाजप नेते मनोज पाटील प्रचंड आग्रही आहेत. त्यासाठी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचे नामांतरण शूर्पारक असे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नालासोपारा अर्थात, शूर्पारक हे प्राचीन भारतातील सर्वात प्राचीन व समृद्ध बंदरनगर आहे. संस्कृतमध्ये शूर्पारक; तर प्राकृतात सुप्पारक असा त्याचा उल्लेख आहे.
नालासोपारा क्षेत्राला गेली 2,500 वर्षे सतत शूर्पारक या नावानेच संबोधले गेल्याचे इतिहास अभ्यासकांनीही मान्य केलेले आहे. पुराणांत शूर्पारकाचे ठिकाण अगदी अचूक भौगोलिक संदर्भासह वर्णिले आहे. शूर्पारक महात्म्य या ग्रंथात थेट श्लोक आहे. त्यात उत्तरेला वैतरणा (वितस्ता) नदी, दक्षिणेला वसई खाडी, पूर्वेला सह्याद्री पर्वत, पश्चिमेला महासागर या चार सीमांच्या मध्यभागी असलेले तीर्थ शूर्पारक म्हणून प्रसिद्ध आहे.
स्कंदपुराणातही या शहराचा स्पष्ट उल्लेख आहे. तर महाभारतात (वनपर्व) मध्येही ‘समुद्रतटसंस्थितम असे वर्णन आहे. हे सर्व भौगोलिक संदर्भ अगदी अचूकपणे आजच्या नालासोपारा-सोपारा-वसई-विरार क्षेत्राचेच आहेत. याच ठिकाणी अशोककालीन स्तूप व शिलालेखांचे अवशेष सापडले आहेत. नवीन संसद भवन वास्तूतील भारतवर्षाच्या नकाशात महाराष्ट्रातील केवळ दोन ठिकाणांचा उल्लेख आहे व त्यापैकी एक शूर्पारक आहे.
दरम्यान; बौद्ध-जैन परंपरेतील स्थान म्हणूनही या शहराला लौकिक आहे. दिव्यावदानमध्ये बुद्धांची सुप्पारक बंदराला भेट, महावंशमध्ये विजयाच्या उतरण्याचे बंदर; तर जैन विविधतीर्थकल्पमध्ये 84 तीर्थांपैकी एक अशी महती आहे. पुरातत्त्वीय व अभिलेखीय पुराव्यात सोपारा येथे सापडलेले इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील अशोकाचे 8 वे व 9 वे शिलालेख आणि इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सीमध्ये सुप्पारा हे प्रमुख निर्यात बंदर आहे.
सध्याचे नालासोपारा हे नाव ब्रिटिशांनी 1865 नंतर रेल्वे स्थानकासाठी लावलेले आहे. हे नाव जवळील दोन गावे म्हणजेच नाळा व शूर्पारकचे सोपारा या अपभ्रंशित नावाचे संकरण आहे. परंतु; कालौघातील स्थित्यंतरे आणि वाढत्या शहरीकरणामुळे या शहराला बदलौकिक प्राप्त झाला. त्यामुळे हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा, जपला जावा. किंबहुना; महाराष्ट्रातील या अतिप्राचीन शूर्पारकाला, देशातील प्रयागराज, अयोध्या, काशी यांच्या धर्तीवर प्राचीन नाव परत मिळून न्याय्यता मिळायला हवी, अशी या भागातील आध्यात्मिक गुरू, इतिहास अभ्यासक जाणकार नागरिक तसेच समस्त शहरवासीयांची मागणी आहे.
विधानसभा मतदार क्षेत्राचे नावही शूर्पारक करण्याची मागणी
राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित केंद्र सरकारच्या विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजप नेते मनोज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच; राज्य सरकारच्या संबंधित विभागांना सूचना देऊन नालासोपारा रेल्वे स्थानकाचे अधिकृत नाव शूर्पारक रेल्वे स्थानक असे बदलावे, गॅझेट नोटिफिकेशनद्वारे नामांतर निश्चित करावे, विधानसभा मतदार क्षेत्राचे नावही शूर्पारक करण्यात यावे आणि रेल्वे व पर्यटन खात्याच्या संयुक्त विद्यमाने शूर्पारक जागृती मोहीम राबवावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.