

ठाणे : लाच प्रकरणी अटकेत असलेले पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अन्य दोन सहकार्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. दरम्यान ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस.शिंदे हे रजेवर गेल्याने सुनावणी एक दिवस लांबणीवर पडली.
बुधवारी ठाणे न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या ऐवजी जामीन अर्जावर न्यायमूर्ती व्ही.जी. मोहिते यांच्या दालनात घेण्यात आली. न्यायमूर्ती मोहिते यांनी मात्र जमीन अर्जावर न्यायमूर्ती शिंदे यांच्या दालनात गुरुवारी होणार असल्याचे स्प्ष्ट केले. यामुळे जामीन मंजूर होणार या आशेवर पाणी फेरले गेले.
लाच प्रकरणातील उपायुक्त शंकर पाटोळे, गायकर आणि सुशांत सुर्वे यांना सोमवारी ठाणे न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस.शिंदे यांच्यासमोर उभे केल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी अशी विनंती केल्यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी त्वरित न्यायमूर्ती शिंदे यांच्या न्यायालयात जामीन अर्ज सादर केला. त्यावर सुनावणीत जामीन अर्जावर बुधवारी सुनावणीची तारीख देण्यात आली. मात्र न्यायमूर्ती एस.एस. शिंदे हे सुट्टीवर गेल्याने जमीन अर्जाला न्यायमूर्ती व्ही.जी. मोहिते यांच्या न्यायालयात ठेवण्यात आले.
दरम्यान आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणीत न्यायमूर्ती मोहिते यांनी जामीन अर्जावर गुरुवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या न्यायालयात होईल, असे स्प्ष्ट केल्याने जामीन अर्जावरील बुधवारची सुनावणी एक दिवस पुढे ढकलली. या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.