

वाडा : मच्छिंद्र आगिवले
जंगल वाचविण्यासाठी एकीकडे वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत असल्याच्या गप्पा करीत असताना दुसरीकडे राजरोस जंगलात कत्तल सुरू आहे. वनविकास महामंडळाच्या वाडा परिमंडळ क्षेत्रात येणार्या सरसओहळ जंगलात साग व खैर या मौल्यवान वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.
आश्चर्य म्हणजे वन विभागाने याबाबत अजून कोणताही गुन्हा दाखल केला नसून तुटलेल्या वृक्षांवर कोणतीही शिक्क्यांची छपाई करण्यात आली नाही. वन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत अधिक चौकशी करून डोळेझाक करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
सरसओहळ - आलमान मार्गावर एका वनपट्ट्यातील कंपार्टमेंट नंबर 512 मध्ये आठ दिवसांपूर्वी वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता खैर प्रजातीची 10 तर सागाची 4 वृक्ष कत्तल केलेल्या अवस्थेत आढळून आली असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. चोरीच्या घटनेला आठ ते दहा उलटले असून वन कर्मचार्यांनी देखील या घटनेची पाहणी केल्याची माहिती आहे मात्र अजून कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नसून कत्तल झालेल्या खोडांवर शिक्का वठविण्यात आलेला नाही.
वनविकास महामंडळ हे वन विभागाचा काहीसा दुर्लक्षित भाग असून वाडा तालुक्यातील मोठे जंगल त्यांकडे संरक्षणासाठी आहे. जंगलातील घटना कुणालाही माहित होणार नाही या उद्देशाने बहुधा गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसावी असा संशय आहे.
वनपट्ट्याचे शेतकरी मृत असून वारसदार देखील बाहेरगावी वास्तव्य करतात अशी ग्रामस्थांनी माहिती दिली असून जंगल रक्षणाची जबाबदारी असणार्या वन विभागाच्या या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. वनविकास महामंडळाच्या अधिकार्यांनी तातडीने रात्रगस्त वाढवून तस्करांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.
आम्हालाही नुकताच याबाबत माहिती मिळाली असून कर्मचार्यांचा अभाव असल्याने संरक्षणात अडचणी येतात, परिसराची पाहणी करून गुन्ह्याची नोंद केली जाईल.
ए. जी. शिरसाट , वनपाल , वाडा परिमंडळ