

खोडाळा ः दीपक गायकवाड
मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. परिसरातील खेड्यापाड्यातील लोकांची येथे मोठी वर्दळ असते. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे.त्यामूळे 1 तपा पासून खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली जात होती. परंतू या ना त्या कारणाने ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत अडकला होता. मात्र सन 2024 मध्ये घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी 30 खाटांचा श्रेणी वर्धन प्रस्तावाला लिखित मंजूरी मिळाली असल्याने लवकरच खोडाळकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार अशी आशा होती.परंतु खोडाळा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांची ही आशा फोल ठरली आहे.
30 खाटांच्या श्रेणी वर्धन प्रस्तावाला मंजुरी मिळताच खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्जिकालीन ल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी त्याची घोषणा केली असून लगेचच संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्यक त्या बाबी पूर्ण करून विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिते पूर्वी सदरचे काम मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी निकम यांनी दिल्या होत्या.त्यामूळे सदरचे काम लवकरच मार्गी लागेल असे चित्र दिसत होते.
या घोषणावजा चर्चेवेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम,रघूनाथ पवार, जिल्हा परिषद सदस्या कुसूमताई झोले, उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच कविताताई पाटील, उपसरपंच उमेश येलमामे, आदिवासी आघाडीचे मिलींद झोले, राष्ट्रवादीचे एकनाथ पवार,माजी सरपंच प्रभाकर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ रामदास मराड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ किरण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भाऊसाहेब चत्तर यांचे सह शेकडो ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
या सर्व मान्यवर व ग्रामस्थांसमोर अधिकारी वर्गांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या होत्या.तथापी विधानसभा निवडणूका होऊनही प्रत्यक्ष कार्यवाही बाबत वस्तुस्थिती दिसत नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे चिन्ह धुसर दिसत आहे.
खोडाळा गांव परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट,देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजूली, सामूंडी ते थेट पहिणा येथूनही खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर वाढणारा रुग्णांचा प्रभाव तसेच खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील 24 महसुली गावे आणि जवळपास 60 हून अधिक गावपाडे संलग्न आहेत. त्यातच इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यातील रुग्णांचा ओघही मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामानाने कमी पडणारी आरोग्य सेवा आणि संदर्भ सेवा मिळवताना आदिवासी निष्कांचन रुग्णांची होणारी दमछाक लक्षात घेऊन शासनाने येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजूरी देण्याची मागणी सन 2016 पासून केली जात होती.
मग नेमकं घोडं अडलंय कुठं.?
ग्रामीण रुग्णालयाचा ठराव घेवून प्रामुख्याने खोडाळा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रल्हाद कदम व सदस्य समितीने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला होता.व सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला आहे.त्याशिवाय तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनीही दरम्यान सकारात्मक भूमिका घेत त्याबाबत धोरणात्मक पावले उचलली होती.परंतू त्यांच्या कार्यावधित मंजूरी मिळाली नसली तरी डॉ.सावंत यांचे त्यात मोठे योगदान असल्यानेच मंजूरी मिळणे सुकर झाले आहे.तथापी मंजुरी मिळूनही एक वर्षाचा अवधी उलटला आहे.मग नेमके घोडे अडले कुठे असा सवाल येथील जनता करत आहे.