

पालघर: पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबत विहिरीनी तळ गाठल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, जलजीवन मिशनची कामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांतील विहिरींची पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पारगाव येथे वांद्री धरणाच्या कालव्याचे पाणी अद्याप पोहोचले नसल्याने गावातील पाणीटंचाई गंभीर बनली आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्रोतांचा आधार घ्यावा लागत असून, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वसरे-खडकोळी ग्रामपंचायत हद्दीतील बाबरपाडा परिसरात विहिरीतील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे बाबर पाड्याच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वाढीव बेट परिसरातही याच प्रकारची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत विहिरींची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत. परंतु विहिरींमध्ये पाणीच नसल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमावर टीका केली आहे.
“विहिरी सजवल्या, पण पाणी कुठे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा तसेच जलजीवन मिशनची रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करून पाणी टंचाईच्या समस्येपासून मुक्तता करण्याची मागणी सफाळे पूर्व-पश्चिम भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.