

पालघर : पालघर तालुक्यातील सफाळे परिसराला महापुराचा मोठा फटका बसला आहे. सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.घरातील धान्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे.
पूर ओसरल्यानंतर नागरिक आपल्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराची आवराआवर करत आहेत. घरातील भिजलेल्या गाद्या, कपाटे, सोफा, फर्निचर आणि इतर वस्तू बाहेर फेकण्याची वेळ अनेकांवर आली आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी आणि मदत करणाऱ्या नागरिकांना आपली व्यथा सांगताना अनेक गृहिणींच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसत आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे अजूनही धक्क्यात असून, परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुराच्या पाण्याने घरातील साठवलेले धान्य पूर्णपणे भिजल्याने अनेक कुटुंबांचा तोंडचा घास हिरावला आहे. कपडे, टीव्ही, कपाटे, वॉशिंग मशीन, फ्रिज, पंखे, विद्युत उपकरणे तसेच पलंग आणि इतर संसारोपयोगी साहित्य खराब झाले आहे. काही घरांमध्ये तर वापरण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना तातडीने अन्नधान्य, कपडे आणि आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.
सफाळे परिसरात पुराच्या पाण्याचा वेग इतका वाढला होता की अनेक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराच्या छताचे पत्रे तोडून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. अचानक आलेल्या या पुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये अजूनही भीतीचे सावट कायम आहे. "असा पूर यापूर्वी कधीही पाहिला नाही," अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
पुराच्या पाण्याचा फटका केवळ घरांनाच नाही तर वाहनांनाही बसला आहे. अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहने पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाचे डीजे, साहित्य आणि इतर उपकरणे पाण्यात भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक पुढे सरसावले आहेत. गरजू कुटुंबांना धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. तसेच श्री कुर्लाई मंदिर ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संकटाच्या काळात मिळणाऱ्या या मदतीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
शासनाच्या मदतीची प्रतीक्षा
दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर आढावा घेऊन पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता प्रशासनाच्या मदतीकडे सफाळेकरांचे लक्ष लागले आहे.