

मोखाडा : रेशन वितरण व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस विविध अडचणी येत असतानाच आता मोखाडा तालुक्यातील इ पॉस मशीनमध्ये नवीनच तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामध्ये जी नावे मराठीमध्ये येतात त्यांना धान्य वाटप करता येत नाही. याशिवाय त्यांची ई केवायसी सुद्धा करता येत नसल्याने अशा अनेक लाभार्थींना चालू महिन्याचे रेशन अद्याप मिळालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मुळात ही तांत्रिक अडचण फक्त मोखाडा तालुक्यात नाही तर राज्यात झाली असल्याची माहिती पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आलेली असली तरी मराठीत नावे दिसणार्या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याने इंग्रजीत नावे सेव्ह असलेल्याना मिळतं मग आम्हाला का नाही? या प्रश्नातून अधिक गोंधळ निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राज्यभरात मराठी शाळा, मराठी भाषा याविषयीचे रणकंदण माजलेले असताना आता या रेशनसाठीच्या ई पॉस मशीनला मराठीचे वावडे आहे काय असा विनोदी सवाल सुद्धा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील मोखाडा तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो या ठिकाणी बहुतांशी लोकांची गुजराण रेशनच्या धान्यावर होत असते. यामुळे दर महिन्याला मिळणारे रेशन अतिशय आवश्यक असते. तालुक्यात अंत्योदय रेशन कार्ड असणार्या कुटुंबांची संख्या 10 हजार 876 तर प्राधान्य रेशन कार्ड असणार्या कुटुंबाची संख्या 8 हजार 850 इतकी आहे.
अशावेळी जेव्हा रेशन वितरण सुरू होते. त्यावेळी रेशन दुकानावर मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळते, मात्र जेव्हा रेशन कार्डधारक रेशन घ्यायला जातात तेव्हा इंग्रजी मध्ये नाव येणार्या कुटुंबांना रेशन मिळते. मात्र सदरच्या मशिनीमध्ये जी नावे मराठीत येतात त्यांना रेशन नाकारले जाते. या बाबत तांत्रिक अडचणी विषयी लोकांमध्ये माहिती नसल्याने तालुक्यात एकच गोंधळ उडाला आहे.
मुळात शासन स्तरावर कोणत्याही योजनेमधील तांत्रिक अडचणीला सर्वसामान्य नागरिक अजिबात जबाबदार नसतात. मात्र या तांत्रिक अडचणींचा थेट फरक येथील नागरिकांवर पडतो यामुळे अशा अडचणींची तात्काळ सोडवणूक करून लोकांना दिलासा देणे आवश्यक आहे किंवा याबाबतची व्यवस्थित माहिती संबंधित लाभार्थ्यांना देणे सुद्धा आवश्यक असते मात्र असे न झाल्याने नेहमीच गोंधळ निर्माण होतो.
ही अडचण फक्त मोखाडा तालुक्या पुरती नसून राज्यभरात यामध्ये तांत्रिक अडचण आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले असून दोन दिवसात ही अडचण दूर होणार असल्याचे आम्हाला कळविण्यात आले आहे. याविषयी सर्व रेशन दुकानदारांना आम्ही सूचना देखील केलेले आहेत.
गौतम भोगे, पुरवठा निरीक्षक, मोखाडा.