

वाडा : मच्छिंद्र आगिवले
भाताचे कोठार म्हणून ज्याची ओळख आहे असा वाडा तालुका वाडा कोलम जातीच्या तांदूळांसाठी जगप्रसिद्ध आहे. 14 हजार हेक्टर क्षेत्रावर येथे भातशेतीचे पीक घेतले जाते. गणपतीच्या दरम्यान भातशेती गर्भारपणात असल्याने तिचे रक्षण करणे यावेळी गरजेचे असते आणि म्हणून याच काळात शेतकरी आपल्या शेतात ठेकार्या ( पेव्ह या झाडाच्या फांद्या रोवणे ) लावतो. पक्षी या फांद्यांवर बसून किटकांपासून शेतीचे रक्षण करतात असे शेतकरी सांगतात.
रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा आज शेतीवर अक्षरशः भडिमार केला जातो ज्याचे अनेक दुष्परिणाम सोसावे लागतात. पूर्वीच्या काळी मात्र कीटकनाशकांचा वापर केला जात नसल्याने शेतकरी निसर्गातूनच काहीतरी क्लुप्ती शोधून आपल्या पिकांचे रक्षण करीत होता. पेव्ह किंवा एखाद्या वृक्षाच्या फांद्या शेतात रोवण्याला ठेकार्या असे संबोधतात ज्याचे अनेक फायदे शेतकर्याला होतात. शेतात ठेकार्या जागोजागी लावल्याने त्यावर पक्षी येऊन बसतात जे पिकांवर पडणार्या आळ्यांचा फडशा पडतात.
शेतात खत किंवा औषध फवारणीसाठी निशाणी म्हणून देखील यांचा वापर केला जातो. झाडाच्या फांद्यांवर बसणारे पक्षी जणू शेताचा ठेका घेतात म्हणूनही त्यांना ठेकार्या असे सांगत असावे असे काही शेतकरी सांगतात. शेतातील पीक जेव्हा कापणीला येते तेव्हा पिकाने भरलेली एक गुंडी या ठेकारीवर लावून पिकाचे रक्षण करणार्या पक्षांप्रति परतफेडीची भावना शेतकरी व्यक्त करतो. पूर्वीपासून शेतकरी हा अत्यंत निसर्गप्रेमी असून अनेक परंपरा लावून त्याने आपल्या निसर्गाचे रक्षण कसे करावे याचे दाखले देऊन ठेवले आहेत. आजच्या काळात या सर्व गोष्टी जरी लुप्त होत असल्या तरी निसर्ग व प्राणी प्रेमाचे हे उदाहरण आजही येथील शेतकरी कटाक्षाने पाळतो.
यांत्रिक व आधुनिक युगात पूर्वजांच्या परंपरा जरी अंधश्रद्धा वाटत असल्या तरी आजही त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पेव्हाच्या ठेकार्या या किरकोळ वाटणार्या परंपरेतून निसर्गप्रेमाचा मोठा धडा घेण्यासारखा आहे. पूर्वजांनी अधोरेखित केलेल्या परंपरा एक समृद्ध वारसा म्हणून त्यांची जपणूक करणं गरजेचे आहे असे पीक गावातील शेतकरी नारायण पाटील सांगतात.
गणपतीच्या दिवशीच रोपण का?
गणपतीच्या दिवशी पेव्ह शेतात रोवून गणपतीचे वाहन असलेल्या उंदिरापासून शेतीचे नुकसान टाळावे असे मागणे शेतकरी मागतो अशी अख्यायिका असून पेव्ह या झाडाच्या बुंध्यात पाणी असते जे शेतकर्याला कापणीच्या वेळी तहान लागल्यावर चावून तहान भागवायला काम येते.