

पालघर : पालघर शहरातील रस्त्यांवर सालाबादाप्रमाणे यंदाही खड्डे पुराण कायम आहे. नगरपरिषद क्षेत्रातील डांबरी रस्त्यांवर दरवर्षी प्रमाणे यंदाही खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्याचा वाहनचालकांसह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तरी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागासाठी हे खड्डे अदृश्य झाले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एक एक फुटाचे खड्डे रस्त्यावर तयार झाले असून ते बुजवणार कधी असा संतप्त सवाल नागरिक आता करू लागले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात टेम्भोडे रस्ता, पालघर माहीम रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वळण नाका मार्ग, सातपाटी रस्ता, बोईसर रस्ता, स्थानक ते मनोरकडे जाणारा रस्ता, कचेरी रस्ता हे प्रमुख वाहतुकीचे व रहादारीचे मार्ग आहेत. पावसाळा आला की हे रस्ते खड्ड्यात जातात. पावसाळा पूर्व नियोजन करणे गरजेचे असताना ते केले जात नाही. परिणामी रस्ते खड्डेमय होऊन रस्त्यांची चाळण होते. रस्त्यात खड्डे पडले की जास्त पाऊस पडल्याने खड्डे झाले असे सोयीस्कर उत्तर देऊन पावसावर आरोप केले जातात. मात्र नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग असे उत्तर देऊन स्वतःची जबाबदारी झटकत आहेत. ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याच खड्डेमय रस्त्यातून या विभागाचे अधिकारी प्रवास करतात. मात्र त्यांना नागरिकांच्या त्रासाचे व होणार्या हालाचे सोयरसुतक नाही असेच त्यांच्या बेजबाबदारपणातून दिसून येते.
खड्डेमय रस्त्यातून खड्डे चुकवताना मोटारसायकल पडून अपघात घडलेले आहेत. यात काहीजण जायबंदीही झालेले आहेत. कंबर दुखीचा त्रास अनेकांना होत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. पाणी निचरा व्यवस्थापनाचे तिनतेरा वाजले आहेत. मान्सून पूर्व गटार सफाईचे योग्य नियोजन नसल्यामुळे पावसाचे पाणी गटारात जाण्याऐवजी गटारचे सांडपाणी व गाळ रस्त्यावर येत आहे. चालायला व्यवस्थित पदपथ नसल्याने रस्त्याच्या कडेला चालताना पादचार्यांच्या अंगावर वाहनांकडून चिखल उडवला जात आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिक संतप्त आहेत.
करोडो रुपयांचा निधी खर्च करून विकास कामाच्या नावाखाली पालघर या मुख्यालयाच्या शहरांमध्ये रस्ते, पाणी, गटार अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्याचे छातीठोकपणे स्थानिक लोकप्रतिनिधी सांगत आले आहेत. मात्र हा विकास नागरिकांच्या मुळावर उठला आहे. निकृष्ट दर्जाची कामे यामुळे या पायाभूत सुविधा खड्ड्यात गेल्या आहेत. नगरामध्ये नागरिकांना सोयी सुविधा, पायाभूत सुविधा पुरवणे नगरपरिषदेची नैतिक जबाबदारी असली तरी या नैतिक जबाबदारी पासून प्रशासन दूर पळत आहे, असेच एकंदरीत यातून दिसत आहे. या लोकांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष, नगरसेवक व लोकप्रतिनिधीही नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. नगरपरिषद हद्दीमध्ये रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पडून अनेक दिवस झाल्यानंतरही हे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला जाग आलेली नाही एखाद्या अपघातात गंभीर जखमी किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रशासन खडबडून जागे होणार आहे का असा सवाल संतप्त नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे
पालघर नगरपरिषदेचे प्रशासन व लोकप्रतिनिधी टक्केवारीच्या गणितामध्ये अडकलेले आहेत. त्यांना सर्वसामान्य नागरिकांची काहीही पडलेली नाही. पायाभूत, मूलभूत सुविधा देण्याच्या नावाने निकृष्ट कामे सुरू आहेत. नगरपरिषदेची अवस्था खेडेगावासारखी बनून राहिली आहे. नागरिक हैराण व संतप्त झालेले आहेत. नगरपरिषदेच्या या कारभाराविरोधात जन आंदोलन छेडले जाणार आहे.
सचिन पाटील, माजी नगरसेवक
नगरपरिषद हद्दीमधील रस्त्यांवरून प्रवास करताना चंद्रावर भ्रमण करून आल्याची अनुभूती होते. तर हे शहर नसून खेडेगाव आहे असे रस्त्यांच्या अवस्थेवरून दिसून येते, अशी उपहासात्मक टीका नागरिकांकडून केली जात आहे. पालघर हे जिल्हा मुख्यालयाचे शहर नसून असुविधानी घेरलेले शहर आहे. येथील लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासनातील अधिकारी यांना नागरिकांची काहीच काळजी नाही. केवळ खिसे भरण्याचे काम सर्वजण करत आहेत असे आरोपही शहरातील सुजाण नागरिकांनी केले आहेत.