

सापाड : पावसाळा सुरू होताच कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक व दुचाकीस्वारांना बसत आहे. याच संदर्भात डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड नवपाडा परिसरात एका रिक्षाचालकाने प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळून स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. संतोष मिरकुटे असे या रिक्षाचालकाचे नाव असून, त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक जाणीवेतून खड्डे भरायला सुरुवात केली आहे.
डोंबिवलीत रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे दररोज वाहनांचे नुकसान होत आहे. तर प्रवाशांचे देखील हाल होत आहेत. परिणामी रिक्षाचालक संतोष मिरकुटे यांनी झाडू, माती, सिमेंट, दगड व इतर साहित्य वापरून छोट्या-मोठ्या खड्ड्यांना बुजवण्याचे काम सुरू केले आहे. या कृतीतून मिरकुटेंनी केवळ आपल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला नाही, तर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिक आणि प्रवाशांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने खड्डे भरून रस्ते सुरळीत करण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले आहे. मात्र डोंबिवलीच्या अनेक भागात विशेषतः नवपाडा, गणेशनगर, टिळकनगर रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या प्रकारामुळे केडीएमसीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संतोष मिरकुटे यांच्या पुढाकारातून नागरिकांमध्ये असलेली नाराजी आणि जागरूकता स्पष्ट होते. स्थानिक नागरिक व प्रवासी आता म्हणत आहेत की, जर प्रशासन काही करत नसेल, तर आम्हालाही उपाय शोधावे लागतील. रस्त्यांवरील खड्डे ही केवळ असुविधा नसून, ती दररोजच्या आयुष्यातील एक गंभीर समस्या आहे. रिक्षाचालक संतोष मिरकुटे यांचा पुढाकार हा एक प्रेरणादायक उदाहरण आहे. प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून तात्काळ कारवाई करावी.
दररोज हाच रस्ता आम्हाला पार करावा लागतो. प्रशासन केवळ आश्वासने देते, प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. केडीएमसीचे अधिकारी एसी ऑफिसमध्ये बसून सांगतात की खड्डे भरले जात आहेत, पण एकदाही त्यांनी या रस्त्यावर येऊन पाहिलं आहे का? असा संताप्त सवाल रिक्षा चालकांना केला आहे.
संतोष मिरकुटे, रिक्षाचालक